नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI Dhananjaya Chandrachud) यांनी बुधवारी एका माहिती पुस्तिकेचे (Hand book) अनावरण केले. या पुस्तिकेत लैगिंक भेदभाव, महिलांविषयी रुढीवादी विचार अधोरेखित करणाऱ्या शब्दांचा समावेश आहे. या शब्दांचा वापर कोर्टाच्या कामकाजात होऊ नये यासाठी पर्यायी शब्दांची यादीदेखील देण्यात आली आहे. त्यामुळे आता कोर्टाच्या कामकाजातून अफेअर, हाऊसवाईफ, प्रॉस्टिट्यूट, ईव्ह टीजिंगसारखे शब्द वापरता येणार नाहीत.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले की, या माहिती पुस्तिकेतून कोणते शब्द पुराणमतवादी, लैंगिक भेदभाव दर्शवणारे आहेत, त्यांना पर्यायी शब्द कोणता वापरता येईल, याची माहिती देण्यात आली आहे.
सरन्यायाधीशांनी सांगितले की, हे पर्यायी शब्द न्यायालयात युक्तिवाद, आदेश आणि निकालाची प्रत करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. ही माहिती पुस्तिका वकिलांसाठी तसेच न्यायाधीशांसाठी आहे. या पुस्तिकेत ते शब्द सांगण्यात आले होते जे आतापर्यंत न्यायालयात वापरले जात होते. यासोबतच हे शब्द चुकीचे का आहेत हेही सांगण्यात आले. त्याच्या मदतीने आम्ही महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणे टाळू शकू, असेही सरन्यायाधीशांनी नमूद केले.
या माहिती पुस्तिकेत अफेअरच्या ऐवजी विवाह बाह्य संबंध, प्रॉस्टिट्यूट/हुकर या शब्दाच्या ऐवजी सेक्स वर्कर, ईव्ह टीजिंगच्या ऐवजी स्ट्रीट सेक्शुअल हॅरेसमेंट, हाऊसवाईफच्या ऐवजी होममेकर, आदी शब्दांचा पर्याय सुचवण्यात आला आहे.
सरन्यायाधीशांनी जारी केलेल्या माहिती पुस्तिकेत अनेक शब्द जेंडर न्यूट्रल शब्दांचा वापर करण्यात आला आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मौसमी भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही पर्यायी शब्दांची माहिती पुस्तिका तयार केली आहे. लिंग रूढींवर आधारित सामान्य परंतु चुकीच्या तर्क पद्धतींवर या माहिती पुस्तिकेत बोट ठेवण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर माहिती पुस्तिका अपलोड होणार
ही पर्यायी शब्दांची माहिती पुस्तिका लवकरच सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले. यासोबतच व्हिडीओ ट्युटोरियल्ससह ई-फायलिंगसाठी युजर मॅन्युअल देखील असेल. या हँडबुकमध्ये न्यायाधीशांना प्रोवोकेटिव क्लॉथिंग ऐवजी क्लॉथिंग हा शब्द वापरण्याची सूचना केली आहे. अविवाहित आईच्या जागी फक्त आई हा शब्द वापरण्याची सूचना करण्यात आली आहे.