Congress Committee Meeting: उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये बदलाची चर्चा सुरु झाली आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीवर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांचीही उपस्थिती आहे. त्याशिवाय मुकुल वासनिक, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेसचे इतर नेतेही उपस्थित होते. या बैठकीत पाच राज्यातील काँग्रेसच्या कामगिरीवर विचारमंथन होणार आहे. सुत्रांच्या वृत्तानुसार, या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या बैठकीत G-23 चे नेतेही असतील, जे नेतृत्व बदल आणि संघटनात्मक सुधारणांच्या मागणीचा पुनरुच्चार करु शकतील. 










उत्तर प्रदेश , उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. पंजाबसारखं मोठं राज्यही काँग्रेसच्या हातून गेलं आहे, तर गोव्यामध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार केला. पण त्या राज्यामध्ये पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या, त्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी आणि रायबरेली या ठिकाणीही काँग्रेसला पक्षाचे उमेदवार निवडून आणता आले नाहीत. 


या निकालांवर काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी सर्वप्रथम प्रश्न उपस्थित केला आहे. ज्यांनी काँग्रेसवर विश्वास ठेवला ते निवडणुकीच्या निकालाने दु:खी झाले आहेत. काँग्रेस ज्या भारतासाठी उभी आहे त्या भारताच्या विचाराला बळ देण्याची आणि देशाला सकारात्मक अजेंडा देण्याची हीच वेळ आहे. आपल्या संघटनात्मक नेतृत्वात सुधारणा करण्याची वेळ आली आहे, ज्यामुळे त्या कल्पनांचे पुनरुज्जीवन होईल, तसेच लोकांना प्रेरणा मिळेल. एक गोष्ट स्पष्ट आहे की, यशस्वी होण्यासाठी बदल आवश्यक आहे, असे थरुर यांनी म्हटले आहे. शशी थरूर यांच्या या ट्विटनंतर दिल्लीतील गुलाम नबी आझाद यांच्या घरी दिर्घ काळ एक बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसच्या G-23 समुहातील नेते उपस्थित होते. या बैठकीत पक्षात नेतृत्व बदलाची मागणी केल्याची माहिती मिळतेय. 


नेतृत्वात कोणत्याही फेरबदलाची गरज नाही - अधीर रंजन चौधरी


सर्वोच्च नेतृत्वात कोणत्याही फेरबदलाची गरज नाही. राहुल-प्रियंका मनापासून प्रयत्न करत आहेत, असे अधीर रंजन चौधरी म्हणालेत. काँग्रेसचे नेते आणि प्रख्यात वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी भविष्यातील निवडणुकांमध्ये अपेक्षित निकालांसाठी "पुनर्रचना" करण्याचे आवाहन केले होते. तसेच या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकांवर भर दिला. मात्र, त्यांनीही सर्वोच्च नेतृत्वात बदल करण्याचे नाकारले आहे.