नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे प्रकृत्ती अस्वस्थामुळे दिल्लीच्या एम्समध्ये दाखल आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी त्यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी एम्सला भेट दिली होती. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंह यांचा एक फोटो काढून तो सोशल मीडियावर टाकण्यात आला होता. त्यावरुन आता काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे हे वर्तन नैतिकतेचा अभाव असणारे आणि प्रसिद्धीसाठी असल्याची टीका केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावर तात्काळ माफी मागावी अशीही मागणी केली आहे. 


काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक ट्वीट करुन ही मागणी केली आहे. ते म्हणाले की, "आरोग्यमंत्र्यांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्या तब्बेतीचा चौकशी करण्यासाठी एम्सला भेट दिली. त्यावेळी त्यांनी लज्जास्पद वर्तन केलं असून ते सर्व काही प्रसिद्धीसाठी केलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे हे कृत्य म्हणजे नैतिकतेच्या सर्व मूल्यांचा अभाव असणारे, माजी पंतप्रधानांच्या खासगीपणाचे उल्लंघन, प्रोटोकॉलचे उल्लंघन तसेच किमान सभ्यतेचा अभाव असणारे आहे. त्यांनी तात्काळ माफी मागावी."


 




केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी गुरुवारी डॉ. मनमोहन सिंह यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी एम्सला भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या फोटोग्राफरने डॉ. मनमोहन सिंह यांचा फोटो काढला होता आणि नंतर तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या फोटोकडे पाहून डॉ. मनमोहन सिंह यांच्या आरोग्याबद्दल देशभरातून चिंता व्यक्त करण्यात येत होती. 


डॉ. मनमोहन सिंह यांच्या मुलीचीही टीका
डॉ. मनमोहन सिंह यांचा फोटो काढण्यावरुन त्यांच्या कुटुंबानेही आक्षेप घेतला होता. मंत्र्यांचा फोटोग्राफर ज्यावेळी फोटो काढत होता त्यावेळी डॉ. मनमोहन सिंह यांच्या पत्नीने त्याला आक्षेप घेतला, त्याला बाहेर जाण्यास सांगितले. पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे त्या खूपच अस्वस्थ झाल्याचं त्यांच्या कन्या दमन सिंह यांनी सांगितलं. 


या भेटीनंतर हाच फोटो शेअर करत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्या तब्बेतीच्या चौकशीसाठी एम्सला भेट दिल्याचं सांगितलं होतं. 


संबंधित बातम्या :