Congress Crisis: पंजाबमधील काँग्रेसचा (Punjab Congress) अंतर्गत कलह आता शांत होत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) भेट घेतल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धूंनी (Navjot Singh Sidhu) पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सिद्धूंची भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्यानंतर सिद्धूंनी काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. त्यामुळे आता सिद्धूच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहणार आहेत. दरम्यान, 10 महिन्यांनी पंजाब विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यात पक्षांतर्गत वादाचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ नये यासाठी काँग्रेसकडून आतापासूनच मोर्चेबांधणी केली जात आहे.
नवज्योत सिंह सिद्धूंनी बैठकीनंतर म्हटलं की, आता सर्व काही व्यवस्थित झालं आहे. मी हायकमांडला माझ्या मनातील काळजी सांगितली. राहुल गांधी, प्रियांका गांधी जो काही निर्णय घेतील तो पंजाबसाठी चांगला असेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी त्यांनी सर्वोच्च मानत असून त्यांच्या आदेशाचं पालन करत आहे, असं सिद्धू यांनी सांगितलं.
काँग्रेसचे नेते हरिष रावत यांनी सांगितलं की, सिद्धू यांनी आपले मुद्दे राहुल गांधींसमोर मांडले. यावेळी त्यांना या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाईल असं सांगण्यात आलं. यावेळी त्यांनी राजीनामा मागे घेत पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली जाईल असं आश्वासन दिलं, असं हरीश रावत यांनी सांगितलं.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नाराजीला न जुमानता काँग्रेस हायकमांडने 18 जुलै रोजी सिद्धू यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. वाद थांबत नसल्याचे पाहून 18 सप्टेंबर रोजी अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर, चरणजीत सिंह चन्नी यांनी 20 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चन्नी सिद्धूचे जवळचे मानले जातात. मात्र, 28 सप्टेंबर रोजी सिद्धू यांनी चन्नी सरकारच्या निर्णयांवर नाराज झाल्यानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.