Manmohan Singh Health Update: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ताप आल्यानंतर त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) दिल्लीत दाखल करण्यात आले आहे. एका सूत्राने सांगितले, “त्यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मनमोहन सिंग यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे आणि काळजी करण्यासारखे काही नाही.


मनमोहन सिंग यांना या वर्षी कोरोना विषाणूची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 19 एप्रिल रोजी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. माजी पंतप्रधानांनी 4 मार्च आणि 3 एप्रिल रोजी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते.



मनमोहन सिंग 88 वर्षांचे आहेत आणि ते साखरेच्या आजारानेही त्रस्त आहेत. माजी पंतप्रधान सिंग यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. त्यांची पहिली शस्त्रक्रिया 1990 मध्ये युनायटेड किंगडममध्ये करण्यात आली. तर 2009 मध्ये त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया एम्समध्ये करण्यात आली. गेल्या वर्षी, एका नवीन औषधामुळे रिअॅक्शन आणि ताप आल्यानंतरही मनमोहन सिंग यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. कित्येक दिवसानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग सध्या राजस्थानचे राज्यसभा सदस्य आहेत. सिंग 2004 ते 2014 पर्यंत पंतप्रधान होते.


डॉ. मनमोहन सिंह यांच्या मोदी सरकारला पत्र लिहून पाच महत्वाच्या सूचना


काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी मोदी सरकारला एक पत्र लिहून पाच महत्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यामध्ये लसीकरणामध्ये पारदर्शकता आणत येत्या सहा महिन्याचा रोडमॅप तयार करण्याची सूचना केली होती. डॉ. मनमोहन सिंह यांच्या पत्राला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राजकीय उत्तर दिलं असलं तरी त्यांच्या सूचना या बऱ्यापैकी स्वीकारल्याचं दिसून आलं आहे.