नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचं नाव आल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.


 

भाजप सरकार सूडबुद्धीने वागत असून, लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने दिल्लीत 'लोकशाही बचाव' मोर्चा काढला आहे.



काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज संसदेवर मोर्चा काढला. या मोर्चात सोनिया गांधींसह उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह दिग्गज नेते सहभागी होणार आहेत.

 

इतकंच नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.

 

दुसरीकडे संसदेच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खलनायकाच्या रूपात दाखवणारं एक पोस्टर तयार करुन आपला निषेध व्यक्त केला.

 

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा यावेळी निषेध करण्यात आला.  तर संसदेतल्या महात्मा गांधींजींच्या पुतळ्यासमोर भाजप खासदारांनीही देशातल्या वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात निदर्शनं केली.

 

त्यामुळे राजधानी दिल्लीत आजचा दिवस हा आंदोलनाचा असल्याचं दिसून येतंय.

 

पर्रिकरांच्या भाषणाकडे लक्ष

 

दरम्यान, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर आज लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आज घोटाळ्यासंदर्भात लोकसभेत बाजू मांडणार आहेत.

 

राज्यसभेतल्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्रिकरांना लोकसभेत हिंदीतून आक्रमकपणे बाजू मांडण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे आजच्या पर्रिकरांच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.