Congress Committee Meeting : नुकत्याच पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. यामध्ये काँग्रेसला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या हाती असलेलं पंजाब राज्य आम आदमी पार्टीच्या हाती गेलं आहे. यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसला खूप अपेक्षा होत्या, मात्र, जनतेनं काँग्रेसला या निवडणुकीतही नाकारलं आहे. दरम्यान, या निकालांच्या पार्श्वभूमीवर मंथन करण्यासाठी आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे. काँग्रेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.


दरम्यान, सोनिया गांधी यांनी सकाळी 10.30 वाजता काँग्रेस संसदीय दलाची आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. इतर मुद्द्यांशिवाय निवडणुकीतील दारुण पराभवावरही मंथन होईल, असे मानले जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही काँग्रेस मुख्यालयात होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीत G-23 चे नेतेही असतील, जे नेतृत्व बदल आणि संघटनात्मक सुधारणांच्या मागणीचा पुनरुच्चार करु शकतील.
 
यूपीमध्ये विधानसभेच्या एकूण 403 जागांवर मतदान झाले, पण काँग्रेसला येथे केवळ 2 जागा मिळाल्या. दुसरीकडे, उत्तराखंडमधील 70 जागांपैकी काँग्रेसला केवळ 19 जागा मिळाल्या. पंजाबमध्ये एकूण 117 जागा आहेत, त्यामध्ये काँग्रेसला केवळ 18, गोव्यात विधानसभेच्या  40 जागांपैकी काँग्रेसला केवळ 11 जागा मिळाल्या. तर मणिपूरमध्ये 60 जागा असून तिथे काँग्रेसला केवळ 5 जागा मिळाल्या आहेत.


या निकालांवर काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी सर्वप्रथम प्रश्न उपस्थित केला आहे. ज्यांनी काँग्रेसवर विश्वास ठेवला ते निवडणुकीच्या निकालाने दु:खी झाले आहेत. काँग्रेस ज्या भारतासाठी उभी आहे त्या भारताच्या विचाराला बळ देण्याची आणि देशाला सकारात्मक अजेंडा देण्याची हीच वेळ आहे. आपल्या संघटनात्मक नेतृत्वात सुधारणा करण्याची वेळ आली आहे, ज्यामुळे त्या कल्पनांचे पुनरुज्जीवन होईल, तसेच लोकांना प्रेरणा मिळेल. एक गोष्ट स्पष्ट आहे की, यशस्वी होण्यासाठी बदल आवश्यक आहे, असे थरुर यांनी म्हटले आहे. शशी थरूर यांच्या या ट्विटनंतर दिल्लीतील गुलाम नबी आझाद यांच्या घरी दिर्घ काळ एक बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसच्या G-23 समुहातील नेते उपस्थित होते. या बैठकीत पक्षात नेतृत्व बदलाची मागणी केल्याची माहिती मिळतेय. 


महत्त्वाच्या बातम्या: