नवी दिल्ली: काँग्रेसच्या तसेच देशाच्या भल्यासाठी गांधी परिवारातील तीनही सदस्यांनी केवळ राजकारण न सोडता थेट संन्यास घ्यावा असं मत ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय विश्लेषक रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. यासंबंधी त्यांनी 'द टेलिग्राफ' या इंग्रजी दैनिकात एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. 


रामचंद्र गुहा यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे की, "देशात जो काही हिंदुत्ववाद्यांचा उच्छाद सुरू आहे त्यासाठी खरं तर गांधी परिवारच कारणीभूत आहे. गांधी परिवाराचे काँग्रेसमध्ये असणं हे मोदींना आणि भाजपला सोईचं आहे. त्यांच्यावर टीका करुन मोदी हे सरकारच्या अपयशापासून लोकांची दिशाभूल करण्यात यशस्वी होत आहेत."


गांधी परिवाराची पाचवी पीढी राजकारणात असून ते आता सर्वसामान्यांच्या संपर्कात नाहीत, त्यामुळे त्यांचा पराभव होतोय असंही मत रामचंद्र गुहांनी व्यक्त केलं आहे. जवळपास 200 जागांवर काँग्रेसची भाजपसोबत थेट लढत होती, त्यामध्ये केवळ 8 टक्के जागा त्या पक्षाला मिळाल्या आहेत, हे पक्षाचं अपयश असल्याचंही ते म्हणाले. 


राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी मोदींसमोर पर्यायी उमेदवार होऊ शकत नाहीत, त्याचा फायदा हा नरेंद्र मोदींना होतोय असंही ते म्हणाले. 


रामचंद्र गुहा देशातील एक महत्त्वाचे राजकीय विश्लेषक समजले जातात. पाच राज्यातील निवडणुकीतील दारुण पराभवानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी राजीनामा देणार असल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यामध्ये येत असतानाच रामचंद्र गुहा यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानलं जातंय. 


दरम्यान, रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी राजीनामा देणार असल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झालं असून ते चुकीचं आणि तथ्यहीन असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केलं आहे. 


रणदीप सुरजेवाला यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, "एनडीटीव्हीच्या हवाल्याने राजीनाम्याच्या ज्या काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या चुकीच्या आणि तथ्यहीन आहेत. एका टीव्ही चॅनेलने सत्ताधारी भाजपच्या अशा प्रकारच्या चुकीच्या प्रचाराला बळी पडणे हे गंभीर आहे."


संबंधित बातम्या: