नवी दिल्ली : देशात कोरोनाने रौद्र रूप धारण केलं आहे. कोरोनामुळे रोज हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतोय. तरीही पंतप्रधानांना नव्या संसदेचं म्हणजे सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच सुचत नाही अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी रंगाचा चश्मा उतरवावा, त्यांना सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच दिसत नाही असंही राहुल गांधी म्हणाले.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "देशभरातील नद्यांमधून हजारो प्रेतं तरंगताहेत, रुग्णालयासमोर भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. लोकांच्या जीवनातील सुरक्षेचा हक्क नाकारला जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी रंगाचा चश्मा उतरवावा, त्यांना सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच दिसत नाही."


 






उत्तर प्रदेश-बिहारमध्ये नद्यांमध्ये कोरोना रुग्णांची प्रेतं
कोरोना काळात उत्तर प्रदेश, बिहार आणि हरयाणामधील नद्यांमध्ये रुग्णांची प्रेतं तरंगताना दिसत आहेत. असं सांगण्यात येतंय की स्मशानात मृत्यू झालेल्या रुग्णांना दहन करण्यासाठी जागा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे ही प्रेतं नद्यांमध्ये सोडण्यात येत आहेत. या घटनेवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय.


राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, देशातल्या अर्ध्या लोकसंख्येकडे इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे त्यांना ऑफलाइन बुकिंगचीही सुविधा मिळावी. 


 




देशातील कोरोनाची स्थिती
गेल्या 24 तासात देशात 3,29,942 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या 24 तासात 3,56, 082 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत तर 3,876 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. सोमवारी ही 3.66 लाख नव्या रुग्णांची भर पडली होती.


गेल्या काही दिवसांची तुलना करता ही संख्या कमी असली तरी देशासमोरील चिंता अजून काही कमी झाली नाही. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा आणि बेड्स तसेच कोरोनाच्या लसींचा तुटवडा आहे. 


महत्वाच्या बातम्या :