Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'नॅशनल हेराल्ड' वृत्तपत्राशी संबंधी ईडीकडून पाच दिवस चौकशी करण्यात आली.  त्यांची चौकशी करणाऱ्या ईडी अधिकाऱ्यांनी एका छोट्या खोलीत इतके दिवस कसे थकले नाहीत, असे विचारल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी आज काँग्रेस कार्यालयात पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी राहुल गांधी यांनी याबाबत सांगितले. ईडीच्या अधिकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी विपश्यना असे उत्तर दिल्याचे सांगितले. 


"मला काही दिवसांपूर्वी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. माझी चौकशी होत असलेली एक छोटी खोली होती. टेबलावर एक संगणक होता आणि तीन अधिकारी होते. मी खुर्चीवरून हलत नसे, अधिकारी ये-जा करायचे. रात्री साडेदहा वाजता अधिकारी मला म्हणाले, अकरा तासात आम्ही थकलो. परंतु, तुम्ही थकला नाही, यामागचे रहस्य काय आहे? मी म्हणालो की विपश्यनेची सवय झाली आहे." अशी माहिती राहुल गांधी यांनी सांगितली. 


राहुल गांधी म्हणाले, त्या खोलीत राहुल गांधी एकटे नव्हते, काँग्रेसचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता त्या खोलीत बसले होते. तुम्ही एका नेत्याला थकवू शकता, करोडो कार्यकर्त्यांना नाही. जो कोणी सरकारच्या विरोधात बोलतो, जो कोणी लोकशाहीसाठी लढतो, ते त्या दालनात उपस्थित होते. 






एवढा संयम कसा?


"शेवटच्या दिवशी ईडीच्या अधिकार्‍यांनी विचारले की, तुमच्यात इतका संयम कसा काय? त्यांना उत्तर दिले नाही. मी 2004 पासून काँग्रेसमध्ये काम करत आहे, आमच्यापेक्षा चांगला संयम कोणाकडे आहे? येथे सचिन पायलट बसले आहेत, सिद्धरामय्या बसले आहेत, रणदीप बसले आहेत. काँग्रेसला दडपून, धमकावता येणार नाही. सत्यात संयमाची कमतरता नसते, असे राहुल गांधी म्हणाले. 


पाच दिवस चौकशी
'नॅशनल हेराल्ड' वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी पाचव्या दिवशी ईडीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची 11 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. चौकशी एजन्सीने राहुल गांधींना कोणतेही नवीन समन्स बजावले नाही. त्यामुळे असे मानले जात आहे की काही काळासाठी आता त्यांची चौकशी संपली आहे. 


राहुल गांधी यांची पाच दिवसांत  54 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली असून त्यादरम्यान मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत  त्यांचे म्हणणे नोंदवण्यात आले आहे.