नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात राजकीय पेचप्रसंग ओढावला आहे. त्यांच्या बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केलं आहे. "महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच," असं उदयनराजे स्पष्टच बोलले. उदयनराजे दिल्लीत बोलत होते.
उदयनराजे काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या राजकारणात मला धक्कादायक असं काही वाटत नाही. दोन वर्षापासून खदखद सुरु आहे. ज्यावेळी वेगवेगळे लोक एका ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र येतात तेव्हा त्यांना कुठलं आमिष दाखवण्याची गरज नसते. पण सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या आयडॉलॉजीचे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांना सत्तेसाठी तारेवरची कसरत करावी लागते. ही लोक फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. त्यामुळेच ही परिस्थिती आहे. कारण यांची विचारधारा वेगवेगळी आहे. ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी त्यांनी विचार करायला हवा होता, टिकलो तर किती टिकणार? लोक आज बोलून दाखवत आहेत की पक्षश्रेष्ठींकडून वेळ दिला जात नाही, कामं होत नाहीत. असं होत असताना ५-६ महिन्यांच्या कालावधीत आमदार-खासदारकीची पाच वर्ष टर्म असते, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या टर्म संपत आहेत. सर्वांना निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे. अशावेळी आपण विचार केला तर शिवसेना आणि भाजपच्या मतदारसंघात विरोधक कोण आहेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी. त्यामुळे ही समीकरणं जुळणार नव्हतीच
संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचे संकेत?
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कालपासूनच राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्वीटमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेत वादळ उठलं. संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलंय की, "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.."
संजय राऊतांच्या ट्वीटनं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे.