नवी दिल्ली काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली (Danish Ali) यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राहुल गांधी यांनी दानिश अली यांची गळाभेट घेतली. लोकसभेत भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांनी दानिश अली यांना उद्देशून अपमानास्पद, असंसदीय शब्द वापरले होते. 


राहुल गांधी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत या भेटीची माहिती दिली. राहुल गांधी म्हटले की, द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान... राहुल गांधी यांच्यासोबत भेट घेतल्यानंतर दानिश अली यांनी म्हटले की, माझे मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी आले होते. राहुल गांधी यांनी म्हटले की, मी फक्त एकटा नाही तर देशातील जेवढे नागरीक लोकशाही मूल्यासोबत आहेत, ते सर्वजण तुमच्या पाठिशी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. दानिश अली यांच्या भेटीच्या वेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेते, खासदार के.सी. वेणूगोपाल हे देखील उपस्थित होते. 










काँग्रेसचा भाजपवर निशाणा 


काँग्रेसने दोन्ही नेत्यांच्या भेटीवर 'एक्स'वर पोस्ट केली आहे. भर सभागृहात भाजप खासदार रमेस बिधुडी यांनी दानिश अली यांचा अपमान केला. त्यांना उद्देशून असंसदीय शब्दांचा वापर करण्यात आला. त्यावेळी भाजपचे दोन माजी मंत्री विचित्रपणे हसत होते, असेही काँग्रेसने म्हटले. भाजप खासदार रमेश बिधुरी यांची वर्तवणूक लोकसभा, संसदेच्या प्रतिष्ठेला कलंक असल्याचे काँग्रेसने म्हटले. 






रमेश बिधुरी यांचे लोकसभेत आक्षेपार्ह वक्तव्य


गुरुवारी संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी लोकसभेत बसप खासदार दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. विरोधी पक्षांनी रमेश बिधुरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी खासदार बिधुरी यांना समज दिली असल्याचे वृत्त आहे.


भाजपकडून कारणे दाखवा नोटीस 


भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही रमेश बिधुरी यांच्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. तसेच भाजपने रमेश बिधुरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप नेतृत्वाने त्यांची टिप्पणी गांभीर्याने घेतली आहे.