नवी दिल्ली इस्रोने चांद्रयान-3  (Chandrayaan 3) बाबत एक मोठी अपडेट दिली आहे. आजपासून चंद्रावर दिवस सुरू झाला आहे. त्यामुळे स्लीप मोडवर गेलेल्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरशी संपर्क करण्यास इस्रोने (ISRO) सुरुवात केली. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांची स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क स्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या त्यांच्याकडून कोणताही संकेत मिळाला नसल्याचे इस्रोने सांगितले. रोव्हर आणि लँडरसोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. 


23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करून भारताने इतिहास रचला होता. चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणारा भारत हा चौथा देश आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा हा जगातील पहिला देश आहे. 






 


लँडर स्लीप मोडवर


चांद्रयान-3 मोहिमेचा लँडर 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 8:00 वाजता स्लीप मोडमध्ये गेला. याआधी ChaSTE, रंभा-एलपी आणि आयएलएसए पेलोडने नवीन जागेवर इन-सीटू प्रयोग केले असल्याची माहिती इस्रोने दिली होती. त्यांनी जमा केलेली माहिती पृथ्वीवर पाठवण्यात आली. 4 सप्टेंबर रोजी पेलोड बंद करण्यात आले आहेत. लँडरचा रिसिव्हर सुरू ठेवण्यात आला आहे. सोलार ऊर्जा आणि बॅटरी संपल्यानंतर विक्रम लँडर प्रज्ञान रोव्हरच्या बाजूला पूर्णपणे स्लीप मोडवर जाणार असल्याची माहिती इस्रोकडून त्यावेळी देण्यात आली होती. 


चंद्रावर आज, 22 सप्टेंबर रोजी पुन्हा दिवस सुरू झाला. त्यामुळे सौर पॅनेल सूर्यप्रकाशाने चार्ज होणे अपेक्षित आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे  दोन्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहेत. या ठिकाणी आज दिवस उजाडेल आणि सूर्यकिरणे येतील, अशी इस्रोला अपेक्षा आहे. रोव्हर आणि लँडरचे सोलर पॅनेल चार्ज झाल्यानंतर दोन्ही पुन्हा इस्रोच्या संपर्कात येतील असे म्हटले जात आहे. 


अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात पहिल्यांदा चांद्रयान-3 ने (Chandrayaan-3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील (Moon South Pole) मातीचे परीक्षण केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच एखाद्या देशाने सॉफ्ट लँडिंग केले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील दक्षिण ध्रुवावर सल्फर असल्याचा निर्वाळा प्रज्ञान रोव्हरने दिला आहे. त्याशिवाय, इतर धातू आणि ऑक्सिजनचे प्रमाण आढळले आहे.