नवी दिल्ली : भारतामध्ये जी-20 परिषद (G-20 Summit 2023) होणार आहे. दिल्लीमध्ये 9 आणि 10 सप्टेंबरला जी-20 परिषद पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे. सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी अनेक पाऊलं उचलण्यात आली आहे. जी-20 परिषदेच्या काळात दिल्लीतील वाहतूक व्यवस्थेतही मोठा बदल करण्यात आला आहे. ठिकठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये भिकारी आणि नशेखोरांना स्पेशल ट्रिटमेंट देण्यात येणार आहे.


दिल्लीतील भिकारी आणि नशेडींना 'स्पेशल ट्रिटमेंट'


नवी दिल्लीमध्ये जी-20 परिषदेच्या पार पडणार असलेल्या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरात खास नियम लागू करण्यात आले आहेत. सर्वसामान्यांना काही भागांत ये-जा करण्यापासून प्रतिबंध करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील कनॉट प्लेस, जनपथ, बंगला साहिब गुरुद्वारा, केजी मार्ग आणि हनुमान मंदिर या परिसरात फिरणारे भिकारी, नशेडी आणि तृतीयपंथी यांना ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून पहाडगंज आणि अजमेरी गेट या दोन्ही बाजूने भिकारी, नशेडी आणि तृतीयपंथी यांना मनाई करण्यात आली आहे.


पोलीस करणार 'खास' पाहुणचार


जी-20 परिषदेच्या ठिकाण आणि आसपासच्या परिसरात आढळणारे भिकारी, नशेडी आणि तृतीयपंथी यांना या परिसरातून दुसऱ्या ठिकाणी शेल्टर हाऊसमध्ये पाठवण्यात येणार आहे. जी-20 परिषदेपर्यंत दिल्ली पोलीस दररोज पत्रकार परिषदेद्वारे विविध सूचना आणि निर्णय यांची माहिती दिली जाईल. जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर भिकारी, अंमली पदार्थांचे व्यसन करणारे आणि तृतीयपंथी यांना गीता कॉलनी, रोहिणी आणि द्वारका सेक्टर-3 च्या बाहेरील भागात पाठवण्यात येणार आहे. 


शेल्टर हाऊसमध्ये रवानगी


दिल्लीत भीक मागणे हा गुन्हा नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने 2019 मध्ये भीक मागणे गुन्हा ठरवणारा कायदा रद्द केला. सध्या दिल्ली पोलीस फूटपाथवर भीक मागणाऱ्या आणि झोपणाऱ्या लोकांना इतर ठिकाणी शेल्टर हाऊसमध्ये पाठवत आहे.


दिल्ली पोलिसांकडून विशेष काळजी


G-20 शिखर परिषदेचे महत्त्व लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली अनेक हॉटेल्स आणि दूतावास आहेत. अशा परिस्थितीत जी-20 परिषदेसाठी येणारे विविध देशाचे प्रतिनिधी देखील या भागात उपस्थित असतील, त्यामुळे या भागात सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली पोलीस नवी दिल्ली परिसरात सर्व भिकारी, अंमली पदार्थांचे व्यसनी, तृतीयपंथी आणि फूटपाथवर झोपणाऱ्या लोकांना शेल्टर होममध्ये पाठवून त्यांची काळजी घेतील. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थाही पोलीस करणार आहेत.