Rahul Gandi vs Smruti Irani : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या लोकसभेतील भाषणामुळे देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याबाबत त्यांनी सरकारलला घेरलं. राहुल गांधींच्या आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. कोणताही पुरावा नसताना केवळ आरोप करण्याचं काम राहुल यांनी केल्याचा सरकारचा दावा आहे. तसेच, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (BJP Leader Smruti Irani) यांनीही राहुल यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 


काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना मोदी सरकारवर सडकून टीका केली. राहुल गांधींनी टीका केली अदानींच्या निमित्ताने राहुल गांधींनी पंतप्रधानांवर एक दोन नव्हे आरोपांची तोफच डागली. गदारोळ सुरूच राहिला, सरकारच्या बाजूनं अनेकवेळा आक्षेप घेण्यात आले, पण राहुल गांधी काही थांबले नाहीत. त्यांनी आपल्या आरोपांचं सत्र सुरूच ठेवलं.  त्यांच्या प्रत्येक आरोपाचा आधार ती 'जादू' होती, ज्यामुळे गौतम अदानी आठ वर्षांत श्रीमंतांच्या यादीत खूप वर आले. राहुल गांधी यांच्या आरोपांच्या मालिकेला सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तरही देण्यात आलंय. राहुल यांनी 'जादू' (Jadu) म्हणून केलेल्या टिकेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) यांनी अमेठीतील 'मॅजिक'नं (Amethi Magic) प्रत्युत्तर दिलं. 


राहुल गांधींनी 'जादू' म्हणून केलेला आरोप नेमका काय? 


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानी प्रकरणावर सविस्तर भाष्य केलं. त्यांनी आपल्या भाषणात एकाच गोष्टीवर जोर दिला, तो म्हणजे गौतम अदानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पूर्ण पाठिंबा मिळाला आणि म्हणूनच ते इतकी प्रगती करू शकले. प्रत्येक मोठा प्रकल्प त्यांच्या बाजूनं गेला. राहुल यांनी अदानींच्या प्रगतीचा 'जादू' म्हणून उल्लेख केला. ते म्हणाले, अशी जादू आहे, ज्यामुळे संपत्तीही वाढत गेली आणि त्यांच्या कंपनीला एकामागून एक अनेक मोठे प्रकल्प मिळाले. राहुल यांनी सरकारवर एकूण 10 आरोप केले. 


पहिला आरोप : ज्या कंपन्या एयरपोर्ट बिजनेसमध्ये नाहीत, त्यांना एयरपोर्ट बिजनेस दिला जात नव्हता. पण या सरकारनं तो नियम बदलला. अदानींकडे सध्या सहा विमानतळं आहेत. 


दुसरा आरोप : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन GVK समुहाकडे होतं. पण जीव्हीके ग्रुपला सीबीआय आणि ईडीचा धाक दाखवून सरकारनं ते अदानी समुहाला देण्यास भाग पाडलं.


तिसरा आरोप : ड्रोन तयार करण्याचं काम अदानींनी कधीच केलं नाही. पण पंतप्रधान इस्त्रायलला जातात आणि ड्रोन बनवण्याचं कंत्राट अदानींकडे दिलं जातं. 


चौथा आरोप : पंतप्रधान इस्त्रायलला जातात, पण जादूच्या माध्यमातून जहाजांची देखभाल, शस्त्रास्त्रांचा व्यवसाय अदानींकडे दिला जातो. 


राहुल गांधींची 'जादू' चालणार? 


राहुल गांधींच्या सर्व आरोपांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. म्हणजेच, प्रत्येक मोठा प्रकल्प अदानींकडे सोपवला गेलाय. गेल्या आठ वर्षांत सरकार फक्त गौतम अदानी आणि त्यांच्या कंपनीवर मेहरबानी करतंय. यासर्व गोष्टींना राहुल गांधींनी लोकसभेत बोलताना 'जादू' म्हणून संबोधलं. पण इथे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, 2019 च्या निवडणुकीत राफेलचा मुद्दा राहुल गांधींनी उचलून धरला होता, त्यांनी चौकीदाराबद्दल घोषणाबाजी केली होती. मग विरोधकांचे आरोप आणि घोषणा दोन्ही निवडणूक निकालात कोलमडले. यावेळी 2024 पूर्वी राहुल गांधी जादू शोधत आहेत, अदानी वादात सरकारशी असलेले संबंध यावरून राजकारण तापलंय. मात्र या आरोपांच्या पार्श्वभूमीवर गांधी कुटुंबावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची फाईल थेट अमेठीतूनच खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उघडलीये. राहुलच्या प्रत्येक जादूच्या आरोपांना स्मृती ईराणी यांनी अमेठीच्या 'जादू'नं उत्तर दिलंय.  


राहुल गांधींच्या 'जादू'च्या आरोपांना स्मृती ईराणींचं 'अमेठी मॅजिक'नं उत्तर 


केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणतात की, अमेठीत एक ट्रस्ट होती. त्यांना सांगण्यात आलं की, तुमच्या वाट्याची आम्हाला चाळीस एकर जागा द्या, आम्ही त्या जागेवर मेडिकल कॉलेज बांधू, चाळीस एकर जागेचे 623 रुपयांप्रमाणं भाडे देऊ. 30 वर्षांपासून अमेठीतील गरीब नागरिकांना तुमच्यासाठी मेडिकल कॉलेज उघडणार असल्याचं वारंवार सांगण्यात आलं. पण आज कोणी अमेठीत गेलं तर त्यांना कळेल की, जिथे मेडिकल कॉलेज सुरू करायचं होतं, त्याच जागेवर या कुटुंबानं आपल्यासाठी एक गेस्ट हाऊस बांधलंय. स्वत:ला गरिबांची एवढीच काळजी आहे तर, सम्राट सायकलची गोष्ट का सांगत नाहीत? त्यात काय 'मॅजिक' आहे, ते तेच सांगू शकतील. सायकल कारखाना उभारू, असं आश्वासन दिलं होतं. उद्घाटनाची रिबीनही कापली, पण कारखाना बंद पडला आणि जमीन फाउंडेशनच्या पारड्यात पडली. गरिबांच्या जमिनी का सोडत नाहीत, परत का करत नाहीत, हे आरोप करणाऱ्यांनी सांगावं, असं म्हणत स्मृती ईराणींनी राहुल गांधींच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Rahul Gandhi In Lok Sabha : लोकसभेत थेट पंतप्रधान मोदींचा अदानींसोबतचा फोटो झळकावला; अदानींच्या मुद्यावर राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांना बोचरा सवाल