मुंबई: आजचा दिवस हा भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा असून याच दिवशी इतिहासात कपिल देवने इतिहास रचला होता. कपिल देवने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात रिचर्ड हॅडलीचा 431 बळींचा विश्वविक्रम मोडला आणि स्टेडियमवर एकच जल्लोष सुरू झाला. तसेच शेअर बाजाराच्या इतिहासात आजचा दिवस महत्त्वाचा असून नॅसडॅक या जगातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक शेअर बाजाराची सुरुवात झाली. यासह इतिहासातील इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात. 


1775: वॉरन हेस्टिंग्जने भारत सोडला.


वॉरन हेस्टिंग्स हा इंग्लिश राजकारणी आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. रॉबर्ट क्लाइव्हने पाया घातलेल्या भारतातील ब्रिटिश राजवटीला हेस्टिंग्सने अधिक बलाढ्य बनवले. हेस्टिंग्स 1750 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कारकून म्हणून नोकरीला लागला आणि त्यासाठी कोलकात्यास आला. त्यानंतर तो एकेक पायऱ्या चढत भारताचा गव्हर्नर जनरल बनला. 1772 ते 1785 या दरम्यान त्याने गव्हर्नर जनरलपदी काम केलं. 8 फेब्रुवारी 1775 रोजी त्याने भारत सोडलं. 


1872- शेर अलीने लॉर्ड मेयोची हत्या केली


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये अनेक क्रांतिकारकांचे योगदान आहे, त्यामध्ये अनेक क्रांतिकारक हे अज्ञात आहेत. असाच एक क्रांतिकारक म्हणजे शेर अली आफ्रिदी. शेर अली आफ्रिदी, ज्याला शेर अली म्हणून ओळखलं जायचं, 8 फेब्रुवारी 1872  रोजी त्याने भारताचा तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मेयोची चाकू भोकसून हत्या केली. शेर अली हा अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होता, त्या ठिकाणीच त्याने मेयोची हत्या केली. भारतातील ब्रिटिश सत्तेला हादरा देणारी ही घटना होती. 


1897- भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांचा जन्मदिन 


डॉ. झाकीर हुसेन (Zakir Husain) हे स्वातंत्र्यसैनिक आणि भारताचे तिसरे राष्ट्रपती तसेच पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते. डॉ. झाकीर हुसेन हे 13 मे 1967 ते 3 मे 1969 पर्यंत देशाचे राष्ट्रपती होते. डॉ. झाकीर हुसेन यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897 रोजी हैदराबाद, तेलंगणा येथे एका श्रीमंत पठाण कुटुंबात झाला. काही काळानंतर त्यांचे वडील उत्तर प्रदेशात राहायला आले होते. झाकीर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती आणि प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ होते. डॉ. झाकीर हुसेन हे भारतातील आधुनिक शिक्षणाचे  समर्थक होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 1920 साली नवी दिल्ली येथे जामिया मिलिया इस्लामिया हे केंद्रीय विद्यापीठ स्थापन झाले.


1941- गायक जगजित सिंह यांचा जन्मदिन 


भारताचे सुप्रसिद्ध गझलकार आणि गायक जगजित सिंह (Jagjit Singh) यांचा आज जन्मदिन. 8 फेब्रुवारी 1941 रोजी त्यांचा जन्म झाला. जगजीत सिंग यांचे नाव सर्वात लोकप्रिय गझल गायकांपैकी एक आहे. गझल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय हे जगजित सिंह यांनाच जातं. जगजित सिंग यांना 2003 मध्ये भारत सरकारने कला क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. फेब्रुवारी 2014 मध्ये त्यांच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ दोन टपाल तिकिटेही जारी करण्यात आली होती.


1971: जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक शेअर बाजार नॅसडॅकची स्थापना 


नॅसडॅक रोखे बाजार ( NASDAQ- National Association of Securities Dealers Automated Quotations) हा अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामधील रोखे बाजार आहे. मॅनहॅटनच्या दक्षिण भागात स्थित असलेला हा रोखे बाजार उलाढालीच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकावरील मोठा बाजार असून येथे शेअर्सची देवाणघेवाण करणाऱ्या सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 19.4 ट्रिलियन डॉलर्स (2021 ची आकडेवारी) इतकं आहे. 8 फेब्रुवारी 1971 रोजी सुरुवात झालेला नॅसडॅक हा जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक शेअर बाजार होता. याची स्थापना 1971 मध्ये बर्नी मॅडॉफ यांनी केली. नॅसडॅक कॉम्पोझिट हा नॅसडॅकवरील सर्व कंपन्यांचा एकत्रित निर्देशांक आहे. नॅसडॅक हे जागतिक वित्तीय बाजाराचं प्रमुख केंद्र आहे. नॅसडॅक सुरू होण्यापूर्वी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा 'ओव्हर द काउंटर' हा मार्ग असायचा. या निर्देशांकाने उदयोन्मुख कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आयपीओचा ट्रेंडही सुरू केला. नॅस्डॅकचा उद्देश एक अशी बाजारपेठ तयार करणे होता जिथे गुंतवणूकदार संगणकाच्या मदतीने जलद आणि पारदर्शक पद्धतीने स्टॉकची खरेदी आणि विक्री करू शकतील.


1994- कपिल देवने रिचर्ड हॅडलीचा 431 विकेट्सचा विश्वविक्रम मोडला


भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी, म्हणजे 8 फेब्रुवारी 1994 रोजी कपिल देवने (Kapil Dev) रिचर्ड हॅडलीचा 431 बळींचा विश्वविक्रम मोडला होता. 8 फेब्रुवारी 1994  रोजी अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात होता. त्या दिवशी कपिल देवला एक अतिशय खास विक्रम नोंदवण्याची संधी होती. हसन तिलकरत्नेला शॉर्ट लेगवर संजय मांजरेकरवी झेलबाद करून कपिल देवने इतिहास रचला. कपिल देवची कसोटी क्रिकेटमधील ही 432 वी विकेट होती. त्याने रिचर्ड हॅडलीचा 431 बळींचा विश्वविक्रम मोडला.


कपिलने रिचर्ड हॅडलीचा विक्रम मोडताच संपूर्ण स्टेडियम कपिलच्या सन्मानार्थ उभे राहिले. यानंतर 432 फुगे हवेत सोडण्यात आले. तिथे आणखी एक रंजक घटना घडली. कपिल देवने विश्वविक्रम करताच दूरदर्शनने त्याचे प्रसारण बंद केले आणि 'हकीकत है या ख्वाब नही, कपिल देव त्‍वड्डा जबाब नही' हे विशेष गाणे वाजवले.


कपिल देवची गणना भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. त्यांने भारतीय क्रिकेटचा कर्णधार म्हणून काम केलं आहे. 1983 च्या क्रिकेट विश्वचषकात तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला.. 2002 मध्ये विस्डेनने त्याला "भारतीय क्रिकेटर ऑफ द सेंच्युरी" म्हणून निवडले. कपिल देवने 10 महिने भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही होते.


2005- इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्धबंदीचा करार 


पश्चिम आशियातील सघर्षाची भूमी असलेल्या इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये (Israeli–Palestine Peace Process) 8 फेब्रुवारी 2005 साली युद्धबंदीचा करार करण्यात आला.