Rahul Gandhi In Lok sabha :  लोकसभेत सुरू असलेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार ठरावावर भाषण करताना काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सत्ताधारी भाजपवर आक्रमक टीका केली. अग्निवीर योजना ( Agniveer Scheme), अदानी (Adani Group) मुद्यांवर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांचे काही फोटो सभागृहात झळकावले. 


राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भारत जोडो यात्रेदरम्यान मुलं, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांसोबत चर्चा केली. तरुणांनी बेरोजगार अथवा कॅब चालवत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी पीएम विमा योजनेतून निधी मिळाला नसल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने ताब्यात घेतल्या. आदिवासींनी आदिवासी विधेयकाबाबत चर्चा केली. लोकांनी अग्निवीरबद्दलही चर्चा केली. अग्निवीर योजनेत भरती झालेल्या युवकांनी चार वर्षानंतर नोकरी जाणार असल्याची भीती व्यक्त केली असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.


अग्निवीर योजना ही संघाची


राहुल गांधी म्हणाले की, सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अग्निवीर योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गृह मंत्रालयाकडून आली आहे. लष्कराने ही योजना सुचवली नाही. अग्निवीर योजना लष्करावर लादली जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकांना शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे आणि नंतर त्यांना समाजात परत जाण्यास सांगितले जात आहे, यामुळे हिंसाचाराला उत्तेजन मिळेल. अग्निवीर योजना एनएसए अजित डोवाल यांनी ही योजना लष्करावर लागू केली, असे त्यांना (निवृत्त अधिकाऱ्यांना) वाटत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. अजित डोवाल यांचा उल्लेख झाल्याने सत्ताधारी भाजपच्या बाकांवरून आक्षेप घेण्यात आला. डोवाल हे सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांचे नाव घेता कामा नये असे त्यांनी म्हटले.


अदानींच्या मुद्यावर सरकारवर टीकास्त्र


अदानींच्या मुद्यावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. आज सगळीकडे अदानींचे नाव आहे. रस्ता कोणी बांधला तर अदानींचे नाव समोर येईल. हिमाचलमधील सफरचंदावरदेखील अदानींचे नाव असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध कसे आहेत, हे देशाला जाणून घ्यायचे असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने फोटो सभागृहात झळकावले. त्यावरून सत्ताधारी भाजपने सभागृहात जोरदार गोंधळ घातला. अदानी हे 2014 मध्ये सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत 609 क्रमांकावर होते. त्यानंतर 9 वर्षात थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहचले. ही जादू मोदीजी दिल्लीत आल्यानंतर सुरू झाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. 


राहुल गांधी म्हणाले की, तरुण आम्हाला विचारत आहेत की अदानी फक्त 8-10 सेक्टरमध्ये आहे. अशा परिस्थितीत त्यांची संपत्ती 2014 मध्ये 8 अब्ज डॉलरवरून 2022 मध्ये 140 अब्ज डॉलरवर कशी पोहोचली? असा प्रश्न विचारत आहेत. 


राहुल गांधी म्हणाले की, मला पंतप्रधान मोदींना दोन-तीन प्रश्न विचारायचे आहेत. आधी पंतप्रधान मोदी अदानीच्या विमानात जायचे. आता अदानी पीएम मोदींच्या विमानात जातात. राहुल गांधी यांनी 'पीएम मोदींच्या विदेश दौऱ्यात तुम्ही आणि अदानी किती वेळा एकत्र गेलात, 'तुम्ही अदानीला किती वेळा भेटलात?, तुमच्यासोबत अदानी किती परदेश दौऱ्यावर आले? तुमच्या भेटीनंतर अदानींना किती देशांमध्ये कंत्राट मिळाले? आदी प्रश्न राहुल गांधी उपस्थित केले.