Congress News : राजस्थानमधील उदयपूरमध्ये सद्या काँग्रेसचे चिंतन शिबिर सुरु आहे. या चिंतन शिबिरात विविध मुद्यांवर चर्चा सुरु आहे. संघटनात्मक बांधणीवर विषेश भर देण्याच्या संदर्भाने काँग्रेस काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी काँग्रसचं नेतृत्व तरुणांना संधी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पातळीवरील समितीपासून कार्यकारिणीपर्यंत  50 टक्के प्रतिनिधित्व हे 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कार्यकर्त्यांकडे देण्याच्या संदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. तसेच तरुणांना रोजगार देण्याच्या मुद्यावरही या चिंतन शिबिरात चर्चा सुरु आहे.


राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये रोजगाराच्या संदर्भात योजना राबवण्याची शक्यता


सध्या देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा मुद्दा समोर येत आहे. अशातच काँग्रेस आपली सत्ता असलेल्या राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये रोजगाराच्या संदर्भात काही योजना राबवण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यामध्ये चिंतन शिबिरात चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस अजय माकन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणांना 50 टक्के प्रतिनिधित्व देण्याच्या प्रस्तावावर चिंतन शिबिरात चर्चा होणार आहे. स्थानिक समितीपासून काँग्रेस कार्यकारिणीपर्यंत संघटनेतील प्रत्येक समितीमध्ये 50 टक्के जागा 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.


नेमका काय आहे 50 50 चा फॉर्म्युला 


50 च्या फॉर्म्युल्याबाबत बोलताना काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिणी नायक यांनी सांगितले की, 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना 50 टक्के प्रतिनिधित्व देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. हा नियम लागू होण्याची शक्यता असल्याचा माहिती रागिणी नायक यांनी दिली. ब्लॉक कमिटीपासून काँग्रेस वर्किंग कमिटीपर्यंत 50 टक्के प्रतिनिधित्व हे 50 वर्षांखालील लोकांना देण्याचा विचार समोर आला आहे. हा फॉर्म्युला लागू करणे शक्य असल्याचेही त्या म्हणाल्या.


रोजगाराचा हक्क घेऊन काँग्रेस पुढे जाऊ शकते


50 वर्षांपेक्षा कमी म्हणजे 45 वर्षांच्या नेत्यालाही जागा मिळू शकते. 40 वर्षांच्या तरुणालाही संधी मिळू शकते. रोजगाराच्या अधिकाराचा संदर्भ देत पक्षाच्या प्रवक्त्या अलका लांबा म्हणाल्या की, या मुद्यावर चर्चा सुरु आहे. काँग्रेस प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करेल. तसेच केंद्र सरकारला येत्या दोन वर्षांत रोजगार, अन्नाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार या मुद्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडू शकेल, असा प्रयत्न असल्याचे लांबा यांनी सांगितले.


राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जिथे काँग्रेस आघाडीची सरकारे आहेत, तिथे चर्चेत समाविष्ट असलेल्या सर्व बाबींची अंमलबजावणी करुन एक आदर्श घालून दिला पाहिजे. जेणेकरुन ते भाजपशासित राज्यांमध्ये लागू करता येतील असेही अलका लांबा यांनी सांगितले. अलका यांनी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात तरुणांच्या प्रश्नांवर 12 तास 30 मिनिटे चर्चा होणार असल्याचे सांगितले. राज्यसभा सदस्य जे बी माथेर यांनीही केंद्र सरकरावर यावेळी टीका केली. ते म्हणाले की, सरकार जातीयवादी अजेंडा घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पाठपुरावा करत आहे, तसेच इतिहासाशी देखील छेडछाड करत असल्याचा आरोप त्यांनी केला.


महत्वाच्या बातम्या: