Rahul Gandhi : सध्या उदयपूरमध्ये काँग्रसचे चिंतन शिबिर सुरु आहे. या शिबिरात काल दिवसभरात विविध मुद्यांवर चर्चा झाली. पण काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाहीत. पण राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी यावेळी काही नेत्यांनी केली आहे. तसेच सक्रिय असणाऱ्या नेत्याकडेच काँग्रसचे अध्यक्षपद देण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे उदयपूर चिंतन शिबिरात काँग्रेस अध्यक्षाबाबत औपचारिक चर्चा झाली नसून, पक्षनेतृत्वात स्पष्टता हवी, अशी मागणी नेत्यांकडून होत आहे. यावेळी राहुल गांधी यांनीच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.यापूर्वी काँग्रेस कार्यकारिणीच्या सर्व बैठकांमध्ये राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणी वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या झालेल्या बैठकीत राहुल यांनी याबाबत आपण गांभीर्याने विचार करत असल्याचे नेत्यांना सांगितले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोनिया गांधी यांच्यावर पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी आली होती.
काँग्रेसच्या या शिबिरामध्ये कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. या शिबिरात विविध समित्यांच्या बैठका पार पडणार आहेत. या समित्यांच्या बैठकांवेळी प्रत्येकाला आपापले मोबाईल बाहेर लॉकअपमध्ये ठेवून जायला सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या चिंतन शिबिरामध्ये ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि गुजरातमधील नेते हार्दिक पटेल उपस्थित नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये राहुल यांची मोठी भूमिका
राहुल गांधी यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तरीदेखील मोदी सरकारविरोधात केवळ ट्विटरवर सक्रियता दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावर बोलताना टी प्रतापन म्हणाले की, पक्षाध्यक्षांनी नियमितपणे सक्रिय रहायला हवं.
राहुल गांधींच्या दौऱ्यांवर टीका
महत्त्वाच्या वेळी परदेश दौऱ्यावर गेल्याने राहुल गांधींवर टीका होत आहे. तसेच त्यांच्या नुकत्याच झालेल्या नेपाळ दौऱ्याबाबत, विविध प्रश्न उपस्थित केले गेले. दरम्यान, काँग्रेसच्या सुरु असलेल्या चिंतन शिबिरात मोठ्या बदलांबाबत चर्चा होणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच काही नेत्यांच्या मागणीप्रमाणे राहुल गांधी पुन्हा काँग्रसचे अध्यक्ष होणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: