मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो न्याय यात्रेतून (Bharat Jodo Nyay Yatra) दोन दिवसांचा ब्रेक घेतला आहे. गुरुवार 25 जानेवारी रोजी राहुल गांधी हे दिल्लीत दाखल झाले होते. या यात्रेला शुक्रवार 26 जानेवारी आणि शुक्रवार 27 जानेवारीसाठी ब्रेक देण्यात आलाय. ही यात्रा पुन्हा पश्चिम बंगालमधून सुरु होईल. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला ब्रेक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बंगालमधील जलपाईगुडी, अलीपुरद्वार, उत्तर दिनाजपूर आणि दार्जिलिंग जिल्ह्यातून जाणार आहे.  त्यानंतर 29 जानेवारीला ते बिहारमध्ये दाखल होईल. यानंतर ही यात्रा 31 जानेवारीला मालदा मार्गे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा प्रवेश करेल आणि मुर्शिदाबादमार्गे जाईल.


बंगालमधील कोणत्या मतदारसंघातून भारत जोडो न्याय यात्रा निघणार?


राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी 25 जानेवारी रोजी बंगालमध्ये दाखल झाली होती. बंगालमधील दार्जिलिंग, रायगंज, उत्तर आणि दक्षिण मालदा आणि मुर्शिदाबादमधील प्रत्येकी दोन लोकसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. मालदा आणि मुर्शिदाबाद हे काँग्रेसचे गड मानले जातात. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे मानलं जात आहे.


बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता बंगालमधून राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रा जाणार आहे. दरम्यान या यात्रेबाबत कोणताही माहिती नसल्याचं देखील टीएमसीकडून सांगण्यात आलं आहे. भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारीला मणिपूरमध्ये सुरू झाली होती आणि ती 20 मार्चला मुंबईत संपणार आहे.  ही यात्रा 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांतून 67 दिवसांत 6,713 किलोमीटरचे अंतर कापणार आहे.


 काँग्रेसच्या या यात्रेचा लोकसभा निवडणुकांमध्ये फायदा होणार?


आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा सकारात्मक परिणाम होणार असल्याचं म्हटलं जातं आहे. राहुल गांधी हे 67 दिवसांच्या प्रवासात 110 जिल्ह्यांना भेट देतील. या यात्रेत लोकसभेच्या 355 जागांचा समावेश असेल, जे देशातील एकूण संसदीय जागांपैकी 65% आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या 355 जागांपैकी 236 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ 14 जागा जिंकण्यात यश आले. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधूनही ही यात्रा जाणार आहे, जिथे काँग्रेसचा नुकताच पराभव झाला आहे. 


हेही वाचा : 


Congress : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात, 67 दिवस, 355 लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींचा दौरा