नवी दिल्ली: काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणीची आज सांगता झाली असून आतापर्यंत एकूण 2 कोटी 60 लाख सदस्यांनी आपलं नाव नोंद केल्याचं समोर आलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही डिजिटल सदस्यत्व नोंदणी केली आहे. 


देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसने पक्षसोबत युवकांना, तरुण पीढीला जोडण्याचं लक्ष्य ठेवलं असून त्याचाच एक भाग म्हणून हे अभियान सुरू केलं होतं. हे अभियान 1 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू झालं असून ते आज म्हणजे 15 एप्रिल 2022 रोजी संपलं. तीन टप्प्यावर व्हेरिफिकेशन करून ही डिजिटल नोंदणी झाल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. याशिवाय अजून प्रत्यक्ष पद्धतीने देखील सदस्य नोंदणी केली जाणार आहे. 


या डिजिटल सदस्य नोंदणीमध्ये दोन कोटी 60 लाख जणांनी आपली नोंदणी केली आहे. त्यानंतर आता प्रत्यक्ष पद्धतीनेही नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे एकत्रित सदस्य नोंदणीचा आकडा नंतर कळेल असा दावा काँग्रेसने केला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या नावाची नोंदणी केली होती. आता या सर्व सदस्यांना डिजिटल आयडी देण्यात येणार आहे. काँग्रेस मेंबरशिप अॅपच्या माध्यमातून याची हाताळणी करण्यात येणार आहे. 


काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितलं आहे की, 2022 ते 2027 या काळात काँग्रेसचे हे सदस्य नोंदणीचे अभियान कायम ठेवण्यात येणार आहे. यामध्ये डिजिटल सदस्य नोंदणी व्यतिरिक्त प्रत्यक्ष पद्धतीने नोंदणी करण्यात येणार आहे. 


या नव्या सदस्य नोंदणीमुळे पक्षांतर्गत निवडणुकीसाठी एक मोठा, व्यापक पाया निर्माण  होणार असून त्यामुळे पक्ष संघटना बळकट होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. 


महत्वाच्या बातम्या: