Hardik Patel : गुजरातमधे युवा चेहऱ्यांवर मदार ठेवत काँग्रेसनं हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी यासारख्या नेत्यांना पक्षात घेतलं. पण त्यापैकी हार्दिकनं आता थेट पक्षाविरोधातच नाराजीचा आक्रमक सूर लावला आहे. त्यामुळे हार्दिकची नाराजी शांत होणार की आपसारख्या दुसऱ्या पर्यायाचा विचार करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
गुजरातमध्ये निवडणुका जवळ आल्यात आणि काँग्रेसमधे अंतर्गत नाराजी, बंडखोरीही उफाळून आलीय. पटेल आरक्षणाचा नेता हार्दिकला काँग्रेसनं पक्षात तर घेतलं. पण तोच हार्दिक पटेल आता काँग्रेसविरोधात जाहीर नाराजी व्यक्त करतोय. गुजरात प्रदेश काँग्रेसचा कार्याध्यक्ष असूनही आपल्यालाच पक्षात दुर्लक्षित केलं जात असल्याचा आरोप हार्दिकनं केला आहे. नसबंदी केलेल्या नवऱ्यासारखी माझी स्थिती, पक्षात लक्ष दिलं जात नाही,असं तो म्हणाला होता.
गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमधली ही बंडाळी उफाळून आल्याचं दिसत आहे.
मागच्या विधानसभेला काँग्रेसनं भाजपला जोरदार टक्कर दिली होती. 182 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे 77 आमदार निवडून आले होते. 1998 नंतर काँग्रेस पहिल्यांदाच गुजरातमध्ये 60 च्या पुढे गेली. याला कारण होतं पटेल समुदायाची नाराजी. या आरक्षण आंदोलनाचा नेता मागच्यावेळी विधानसभेत थेट काँग्रेससोबत नव्हता..पण तरी भाजपबद्दलची नाराजी मात्र स्पष्ट दिसत होती, त्याचा फायदा काँग्रेसला झाला.
निवडणुकीनंतर हार्दिकला काँग्रेसनं थेट पक्षात घेतलं. अगदी 28 व्या वर्षी गुजरात काँग्रेसचा कार्याध्यक्ष म्हणूनही जबाबदारी दिली. पण अनेक ज्येष्ठ नेते हार्दिकला जुमानत नसल्याची चर्चा होती.
काँग्रेसमध्ये जिथं निवडणूक, तिथं बंडाळी
पंजाब, उत्तराखंडपाठोपाठ आता गुजरात..जिथं निवडणूक तिथं काँग्रेसमधे अंतर्गत बंडाळीचं चित्र दिसतंय
गुजरातच्या सौराष्ट्र भागातले मोठे पाटीदार नेते नरेश पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु आहे
नरेश पाटील यांच्या प्रवेशाला उशीर होत असल्याचा त्रागा हार्दिक पटेलनं व्यक्त केलाय
पण दुसरीकडे नरेश पाटील पक्षात आल्यावर हार्दिकचंही वजन कमी होईल अशीही चर्चा आहे
मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर हे तीन युवा चेहरे भाजपविरोधात उभे होते.
मागच्यावेळी अपक्ष आमदार बनलेल्या जिग्नेशनं नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय
तर अल्पेश ठाकोर हे ओबीसी समाजाचे नेते. त्यांनी निवडणुकीनंतर काँग्रेस सोडत भाजपची वाट धरली
दुसरीकडे हार्दिकची नाराजी कुठल्या वाटेनं जाणार याचीही उत्सुकता आहे. नुकतीच सुप्रीम कोर्टानं 2015 च्या आंदोलनातल्या हिंसेप्रकरणी हार्दिकला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक लढवण्याचा त्याचा मार्गही मोकळा झालाय. त्यामुळे यावेळी हार्दिक कुठून लढणार याचीही उत्सुकता आहे.
एकीकडे पंजाब जिंकल्यानंतर आम आदमी पक्षानं आपला मोर्चा गुजरातकडेही वळवला आहे. त्यामुळे हार्दिकच्या नाराजीचं काय होतंय याकडे आम आदमी पक्षही लक्ष ठेवून असेल. गुजरातमध्ये 1995 पासून भाजपची एकहाती सत्ता आहे..सलग 27 वर्षे..पण तरीही अँटी इन्कबन्सीचा फायदा काँग्रेसला मिळत नसेल तर मग हार्दिकसारखे युवा नेते आपसारखा दुसरा पर्याय चाचपून पाहणार का याचीही उत्सुकता असेल.