Tax On Petrol Diesel : देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. अशातच पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने राज्यांच्या खांद्यावर टाकली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले आहे. राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे केंद्राने आवाहन केले आहे. परंतु,केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी का करत नाही? असा प्रश्न सर्व सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
केंद्र सरकारकडून 4 नोव्हेंबर 2021 पूर्वी पेट्रोलवर प्रति लिटर 32.90 रुपये आणि डिझेलवर 31.80 रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क आकारण्यात येत होते. 2014 मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यापासून ज्या-ज्या वेळी कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट झाली, त्यावेळी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवले आहे.
मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी यूपीए सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलवर 9.20 रुपये आणि डिझेलवर 3.46 रुपये प्रतिलिटर उत्पादन शुल्क आकारले जात होते. परंतु, मोदी सरकारने पेट्रोलवर 23.7 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 28.34 रुपये प्रति लिटरने वाढवले. पाच राज्यांतील निवडणुका लक्षात घेऊन सरकारने दिवाळीवेळी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपयांनी आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांनी कपात केली होती. तरीही मोदी सरकारकडून पेट्रोलवर 27.90 रुपये आणि डिझेलवर 21.80 रुपये उत्पादन शुल्क आकारण्यात येत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये फेब्रुवारीपासून युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.सध्या कच्चे तेल प्रति बॅरल 130 डॉलरच्या वर पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांची वाढ केली आहे. याचाच अर्थ सरकारने दिवाळीला दिलेला पाच रूपयांचा दिलासा मागे घेतला. परंतु, कच्चे तेल महागल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क सरकारने कमी केले नाही.
इंधन दर वाढीमुळे घरगुती वापराच्या इतरही वस्तू महाग झाल्या आहेत. शिवाय गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. आधीच कोरोनामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला असताना आता वाढत्या महागाईने तो हैराण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले तर महागाईला काही प्रमाणात आळा बसेल, असे जाणकारांचे मत आहे.