दिल्लीत पंख्याच्या कारखान्यात स्फोट, 7 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 04 Jan 2019 07:17 AM (IST)
दिल्लीमधील मोतीनगरमधल्या सुदर्शन पार्कमध्ये गुरुवारी रात्री एका पंख्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे कारखान्याची इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : मोतीनगरमधल्या सुदर्शन पार्कमध्ये गुरुवारी रात्री एका पंख्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे कारखान्याची इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. स्फोट झाल्यापासून या ठिकाणी बचाव कार्य सुरु आहे. रात्री पावणे नऊच्या सुमारास या कारखान्याच्या तिसऱ्या मजल्यावरील कम्प्रेसरमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे कारखान्याच्या इमारतीचे दोन मजले कोसळले. स्फोटाच्या वेळी इमरातीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर 20 हून अधिक कामगार काम करत होते. रात्री 8.48 वाजता अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाल्या. काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आसल्यामुळे बचाव कार्य अजूनही सुरु आहे. घटनेत 8 जण जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.