भुवनेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ओदिशातील पुरीमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. ओदिशातील भाजपच्या एका आमदाराने असा दावा केला आहे. मोदींनी पुरीमधून निवडणूक लढवावी अशी मागणी ओदिशातील भाजपकडून होत आहे. पुरीतील जग्गनाथ मंदिर देशभरात प्रसिद्ध आहे. मोदींच्या माध्यमातून भाजपची ओदिशातील स्थिती सुधारण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.


बीजू जनता पक्षाचे पिनुकी मिश्रा हे सध्या पुरीचे खासदार आहेत. बीजू जनता दलची ओदिशामध्ये सत्ता आहे. नवीन पटनाईक हे मागील 18 वर्षांपासून ओदिशाचे मुख्यमंत्री आहेत. पटनाईक यांना आव्हान देण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही नवीन पटनाईक यांच्या पक्षाने 21 पैकी 20 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही ओदिशाकडे जास्त कल असताना दिसत आहे. 15 दिवसांच्या कालावधीत मोदी दुसऱ्यांदा ओदिशा दौऱ्यावर जाणार आहेत. 5 जानेवारीला मोदी बरीपदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यापूर्वीही मोदींनी भुवनेश्वर विमानतळावरुन शहरापर्यंत रोड शो करुन मोठं शक्तीप्रदशन केलं होत.

ओदिशामधील नगर पालिकेच्या निवडणूकीत भाजपने काँग्रेसला मोठा धक्का देत विजय मिळवला होता. त्यामुळे भाजपचं मनोबल वाढताना दिसत आहे. बीजू जनता दल आणि भाजपची नऊ वर्ष युती होती. मात्र बीजेडीने 2009 साली आपली चूल वेगळी मांडली होती. तेव्हापासून भाजप ओदिशात अच्छे दिनच्या प्रतिक्षेत आहेत. 2014च्या निवडणुकीत भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहीली होती. बिजेडीला 43.35 काँग्रेसला 25.71 तर भाजपला 18 टक्के मतं पडली होती.