Cognizant : दिग्गज आयटी कंपनी कॉग्निझंटने (Cognizant) 3,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय खर्च कमी करण्यासाठी कंपनी आपली काही कार्यालयेही बंद करणार आहे. तसेच कंपनीमध्ये कॉस्ट कटिंगची प्रक्रिया सुरू झाली असून जवळपास 80 हजार कर्मचारी काम करु शकतील अशी एक कोटी 10 लाख स्क्वेअर फूट जागा कमी वापरात आणण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याची माहिती आहे. 


कॉग्निझंट ही अमेरिकेची कंपनी आहे, परंतु तिचं कामकाज हे मोठ्या प्रमाणात भारतातून चालतं. अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये असलेल्या मंदीचा परिणाम आयटी कंपन्यांच्या कमाईवर झाला आहे. कॉग्निझंटमध्ये सध्या 3 लाख 55 हजार 300 कर्मचारी आहेत.


कंपनीचे नवनियुक्त सीईओ रवी कुमार एस यांनी अमलात आणलेल्या निर्णयापैकी हा एक निर्णय आहे. कॉग्निझंट ही कंपनी नॅस्डॅक-सूचीबद्ध असून कंपनीसमोर ऍक्सेंचर, टीसीएस आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे कॉस्ट कटिंग आणि कर्मचारी कपात हे उपाय कंपनीने अवलंबलं आहे. 


कॉग्निझंटच्या महसूलात घट


कॉग्निझंटने त्याचा आर्थिक अहवाल जाहीर केला असून त्याच्या नफ्यात किरकोळ म्हणजे केवळ तीन टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून येतंय. कंपनीचा एकूण महसून हा 4.81 अब्ज डॉलर्स असून हा महसूल 0.3 टक्क्यांनी कमी झाल्याचं स्पष्ट आहे.  


मेटा आणि IBM वर देखील टाळेबंदी


फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटा 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कर्मचारी कपात या महिन्यापासून म्हणजेच मे महिन्यापासून सुरू होईल. मेटा ने यापूर्वी 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते, जी संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या 13 टक्के इतकी होती.


टेक कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्प (IBM) सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे  AI वर काम करत असून नवीन नोकर भरती थांबवण्यात आहे. कंपनीचे सीईओ अरविंद कृष्णा यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत कंपनीची ही योजना स्पष्ट केली. अरविंद कृष्णा म्हणाले होते की, कंपनीमध्ये सध्या सुमारे 26,000 कामगार हे अक्रियाशील भूमिकेत आहेत. मला दिसत आहे की पुढील 5 वर्षांत 30 टक्के कर्मचारी एआय आणि ऑटोमेशनद्वारे बदलले जातील. याचा अर्थ IBM सुमारे 7800 कर्मचाऱ्यांना कमी करून त्या ठिकाणी AI चा वापर करू शकते.


डिस्ने 4 हजार कर्मचाऱ्यांना काढणार 


त्याचप्रमाणे अमेरिकेतील दिग्गज मास मीडिया आणि मनोरंजन कंपनी वॉल्ट डिस्नेनेही टाळेबंदीची दुसरी फेरी सुरू केली आहे. या फेऱ्यात सुमारे 4,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील. या वर्षाच्या सुरुवातीला डिस्नेने 7,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते.


यादेखील बातम्या वाचा: