Meta Layoff: मेटा प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा नोकरकपात करण्याच्या तयारीत आहेत. फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाने आता व्यवस्थापकांना मेमो जारी करत नोकरकपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या नोकरकपातीत फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (Whatsapp), इंस्टाग्राम (Instagram) आणि संबंधित कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे संकेत मेटा कंपनीने दिले आहेत.


मार्चमध्ये मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी जाहीर केल्यानुसार, नोकरकपात ही खर्च कमी करण्याच्या उपायांचा एक भाग आहे ज्यामुळे महिन्याअखेरीस कंपनीतील 10 हजार पदे कमी होतील. नोकरकपातीची आणखी एक फेरी मे महिन्यात सुरू होणार आहे.


नोव्हेंबरमध्ये मेटाने सुमारे 13 टक्के कर्मचारी म्हणजेच जवळपास 11 हजार नोकऱ्या कमी केल्या आहेत. कंपनीच्या व्यवस्थापकांना मेमोमधून जारी केलेल्या सूचनेनुसार, मेटाअंतर्गत टीम्सची पुनर्चना केली जाणार आहे आणि उर्वरित कर्मचाऱ्यांना नवीन व्यवस्थापकांच्या अंतर्गत काम करण्यासाठी पुन्हा नियुक्त केले जाणार आहे.


जाहिरातींच्या श्रेणीतील अधिक निर्बंधांमुळे मेटाच्या कमाईत कमालीची घट झाली आहे. याचाच परिणाम थेट कंपनीच्या जाहिरातींच्या उत्पन्नावर झाला आहे. मेटाव्हर्स या नवीन प्लॅटफॉर्मवरून देखील महसूल मिळत नाही. मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग (Meta CEO Mark Zuckerberg) यांनी 2023 हे वर्ष कंपनीसाठी 'कार्यक्षमतेचे वर्ष' म्हणून घोषित केले आहे. परंतु, खरेच तसे होणार का हा प्रश्नच आहे. मेटा कंपनी अलीकडे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेत आहे. या अनुषंगाने, अनेक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार असल्याची चिंता लागून आहे.


हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार


मेटा कंपनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मजबूत करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेत आहे. यामुळे कंपनी आता आणखी 10 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची शक्यता आहे. या आठवडाभरात ही नोकरकपात करण्यात येऊ शकते आणि लवकरात लवकर अंतिम निर्णय होऊ शकतो, असे एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.


टेक कंपन्यांमध्ये मोठी नोकरकपात


आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर टेक कंपन्यांनी यावर्षी मोठी नोकरकपात केली आहे. अॅक्सेंचर (Accenture), अॅमेझॉन (Amazon), मेटा (मेटा) आणि इतर टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपातीच्या घोषणा केल्या आहेत. अॅमेझॉनने 27 हजार, मेटाने 21 हजार, अॅक्सेंचरने 19 हजार, मायक्रोसॉफ्ट 10 हजार, अल्फाबेट 12 हजार, सेल्फफोर्स 8 हजार, एचपी 6 हजार, आयबीएम 3 हजार 900, ट्विटर 3 हजार 700 आणि सेगागेट कंपनीने 3 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: