नवी दिल्ली : देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज संकटाचे ढग अधिक गडद होत असल्याचं चित्र आहे. कोळशाच्या पुरवठ्याअभावी देशातील बहुतांशी भाग अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने त्यांच्या वेबसाईटवर 11 ऑक्टोबरला दिलेल्या माहितीनुसार, देशातील 15 विद्युत उत्पादन केंद्रात एक दिवस चालेल इतकाही कोळशाचा साठा शिल्लक नाही. त्यामध्ये उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यातील प्रत्येकी तीन तर महाराष्ट्र आणि बंगालमधील प्रत्येकी दोन केंद्रांचा समावेश आहे. यासह देशातील अनेक केंद्रांची अवस्थाही चांगली नाही.
परिस्थिती चांगली, केंद्राचा दावा
देशातील कोळसा तुटवड्यामागे पावसाचं कारण सांगितलं जातंय. अतिवृष्टीमुळे पुरवठा आणि उत्पादनात किंचित घट झाली आहे. केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, “केंद्राने राज्यांना जानेवारी ते जुलै या कालावधीत कोळसा घेऊन साठा वाढवण्याची विनंती केली होती. कारण पावसाळ्यात अडचणी निर्माण होत असतात. पण, त्यांनी तसे केले नाही. त्यांना पैसे द्यावा लागणार नव्हता, कोळसा क्रेडिटवर उपलब्ध झाला असता.”
दररोज पुरवण्यात येणारा कोळसा सुरळीत राहील आणि येत्या 15-20 दिवसात स्टॉक वाढण्यास सुरुवात होईल असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
कोळशाचा तुटवडा का निर्माण झाला?
देशात कोळशाचा तुटवडा निर्माण होण्यामागे प्रमुख चार कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. देशातील अर्थव्यवस्था चांगलीच सुधारतेय. त्यामुळे विकासाला गती मिळत असून कोळशाच्या मागणीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे असं सांगण्यात येतंय. तसेच कोळशाच्या खाणी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी गेल्या काही दिवसात पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे. त्यामुळे या खाणींमध्ये पावसाचं पाणी साचल्याचं चित्र आहे. भारतात आयात करण्यात येणाऱ्या कोळशाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच मान्सूनच्या आधी आवश्यक प्रमाणात कोळशाचा साठा करण्यात आला नाही.
संबंधित बातम्या :