Coal Crisis : देशात एकीकडे कोळशाअभावी विजेचं संकट घोंगावतंय. असं असताना काही प्रकल्प विजेच्या दृष्टीनं आशेचा किरण बनले आहेत. परभणीच्या जिंतुर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाच्या वीज निर्मिती केंद्रातून 10 सप्टेंबर 2021 रोजी 5 लाख 46 हजार युनिट वीज निर्मिती झाली आहे. तर दिनांक 7 ऑक्टोबर रोजी विद्युत केंद्राच्या 53 वर्षांच्या इतिहासातील सर्वोच्च वीज निर्मिती करण्यात आली. तब्बल 5 लाख 52  हजार युनिट वीज निर्मिती करून एक नवा उच्यांक प्रस्थापित केला आहे.


परभणी जिल्ह्यातील येलदरी येथील 33 टीएमसीच्या जलाशयावर 7.5 मे.वॅट क्षमतेचे तीन विद्युत निर्मिती संच स्थापीत आहेत. यावर्षी धरण साठा क्षेत्रात मुबलक पाऊस पडल्यानं येलदरी धरणानं सप्टेंबर महिन्यात पाणी साठ्याची शंभरी तर गाठलीच परंतु, विसर्गसुद्धा करावा लागला.या मुळे वीज निर्मिती केंद्राचे तिन्ही संच सुरु केल्यामुळे 7 ऑक्टोबर रोजी 5 लाख 52 हजार युनिट वीजेची निर्मिती करुन येलदरी जल विद्युत केंद्राने एक दिवसातील वीज निर्मितीचा नवीन उच्चांक गाठला. केंद्राच्या कार्यकाळातील ही उचुत्तम कामगिरी आहे.


7 सप्टेंबरपासून आज मितीपर्यंत धरण 100 टक्के भरल्यानंतर बोनस पाण्यावर येथे वीज निर्मिती सुरू आहे  अजूनही धरणाचे दोनमुख्य दरवाजे सुरूच असून वीज निर्मिती केंद्रातून पूर नियंत्रण करून तीन संचामधून 24 तासात 22.50 मेगावाट वीज निर्मिती सुरु आहे.


कोळसा तुटवड्याचं संकट दूर होणार? पंतप्रधान कार्यालयाकडून आढावा घेण्याचं काम सुरु


देशातील कोळशाच्या तुटवड्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली असून सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे कोळशाच्या टंचाईचा आणि त्यामुळे येऊ घातलेल्या वीजेच्या संकटाचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय कोळसा मंत्री तसेच केंद्रीय उर्जा मंत्र्यांसोबत एक महत्वाची बैठक घेऊन या प्रश्नावर चर्चा केली. 


कोळशाच्या तुटवड्यामुळे देशावर वीज संकटांची टांगती तलवार आहे. तातडीने उपाय शोधला नाही तर देश अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर अनेक राज्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. पण तशी कोणतीही परिस्थिती नसल्याचं केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीचं स्पष्ट केलं होतं. केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं होतं की, "देशातील कोळसा उत्पादन आणि पुरवठा परिस्थितीचा केंद्राने आढावा घेतला आहे. देशात वीज पुरवठा खंडीत होण्याचा कोणताही धोका नाही. कोल इंडिया लिमिटेडकडे 24 दिवसांचा पुरवठा करता येईल इतका 43 दशलक्ष टन कोळसा साठा उपलब्ध आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचा कोळसासाठा दररोज कोळसा पुरवठा करून वाढविला जात आहे. मान्सूनच्या परतीसोबत कोळसा पाठवण्यामध्ये आणखी वाढ होईल, ज्यामुळे कोळशाचा साठा वाढेल."


कोळशाचा तुटवडा का निर्माण झाला? 


देशात कोळशाचा तुटवडा निर्माण होण्यामागे प्रमुख चार कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. देशातील अर्थव्यवस्था चांगलीच सुधारतेय. त्यामुळे विकासाला गती मिळत असून कोळशाच्या मागणीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे असं सांगण्यात येतंय. तसेच कोळशाच्या खाणी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी गेल्या काही दिवसात पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे. त्यामुळे या खाणींमध्ये पावसाचं पाणी साचल्याचं चित्र आहे. भारतात आयात करण्यात येणाऱ्या कोळशाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच मान्सूनच्या आधी आवश्यक प्रमाणात कोळशाचा साठा करण्यात आला नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :