Climate change : हवामान बदल (Climate change) हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत देशातील महत्त्वाच्या नेत्यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिका सरकारनं (US Govt) गुरुवारी (20 एप्रिल) प्रमुख अर्थव्यवस्थांच्या उर्जा आणि हवामान या विषयाशी संबंधित मंचातील नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत हवामान बदलाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन (Joseph Biden) यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. यावेळी जगभरातील विविध देशांचे प्रमुख आणि इतर मंत्री या बैठकीला उपस्थित होते.
हवामान बदलावर संयुक्त सुधारित कृती आवश्यक
हवामान या विषयाशी संबंधित गटामध्ये जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्था सहभागी आहेत. यामध्ये अर्जेन्टिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, इजिप्त, युरोपीय महासंघ, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, सौदी अरेबिया, तुर्कस्थान, संयुक्त अरब अमिरात आणि युके या देशांचा समावेश आहे. काल झालेल्या बैठकीत जगातील विविध देशांच्या नेत्यांनी आपलं मत व्यक्त केलं. हवामान बदल हे सर्वात मोठे आव्हान असून त्यावर संयुक्त सुधारित कृती आवश्यक असल्याचं मत सर्व नेत्यांनी व्यक्त केलं.
भारत हवामान बदलाच्या समस्येशी लढण्यात आघाडीवर
या बैठकीत भारताकडून केंद्रीय पर्यावरण,वने आणि हवामान बदल विभागाचे मंत्री भूपेंद्र यादव सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं. जागतिक दरडोई उत्सर्जन पातळीच्या एक तृतीयांश उत्सर्जनासह, भारत हवामान बदलाच्या समस्येशी लढण्यासाठीच्या जागतिक प्रयत्नांमध्ये आघाडीवर आहे. यावर अधिक भर दिल्याचे मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले. यावेळी त्यांनी उर्जा, वाहतूक, नौवहन, हायड्रोफ्लुओरोकार्बन्स यांसारख्या क्षेत्रांतील हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी भारताने सुरु केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच कार्बन कॅप्चरचा वापर आणि साठवण यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांची माहितीही मंत्री भूपेंद्र यादव यांनी यावेळी दिली.
हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोका
माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमान वाढतं असल्याचे चित्र दिसत आहे. या हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत. जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. भयानक दुष्काळ होतील, समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी-प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील. वाढत्या मानवी घडामोडींमुळं कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण वाढलं आहे. परिणामी तापमानातही वाढ झाली आहे. हवामान बदलामुळं आपली जीवनशैली बदलू शकते. सुपीक जमिनीचं रेताड जमिनीत रुपांतर होईल. पाण्याच्या कमतरतेुमळं पिकं, अन्न उगवणं देखील कठीण होईल. समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळं काही भागांत प्रचंड उष्णता वाढेल, आणि ते ठिकाण निवास करण्यास योग्य राहणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या: