Army Vehicle Caught Fire in Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पुंछ-जम्मू महामार्गावर गुरुवारी (20 एप्रिल) लष्कराच्या वाहनाला आग लागली. लष्कराने याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. पीआरओ डिफेन्स जम्मू यांनी सांगितले की, पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या ट्रकला लागलेल्या आगीत लष्कराच्या जवानांचा मृत्यू झाला. भाटा धुरियन परिसरात महामार्गावर ही घटना घडली. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना या घटनेची माहिती दिली आहे.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछ दरम्यान धावणाऱ्या लष्कराच्या वाहनावर अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यामुळे वाहनाला आग लागली असावी असे अंदाज आहे.
शोध मोहीम सुरू
लष्कराने सांगितले की, "या भागात दहशतवादविरोधी कारवाईसाठी तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या जवानांना या घटनेत आपल्या प्राणाचे सर्वोच्च बलिदान द्यावे लागले आहे. एक जवान गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तात्काळ राजौरी येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या भागात लष्कराने शोधमोहीम सुरू केली आहे. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना घडलेल्या डोंगराळ भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुंछ जिल्ह्यातील हल्ल्यावर शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेने दु:ख झाल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. लष्कराच्या वाहनाला आग लागल्याने भारतीय सैन्याने आपले शूर जवान गमावले आहेत. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या शोकभावना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत असे त्यांनी म्हटले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पुंछमध्ये झालेल्या हल्ल्यात भारताने पाच जवान गमावले आहेत. ही बातमी अतिशय दु:खद असल्याचे त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: