नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधकांच्या भूमिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन काही राजकीय पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. या विधेयकाच्या आधारे लाखो लोकांच्या जीवनात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. ही गोष्ट अनेकांना समजून घ्यायची नाही. भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.


लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. आम्ही तेच निर्णय घेतले ज्यासाठी आम्हाला जनतेनं निवडून दिलं. देशासाठी जगावं आणि देशासाठी मरावं, हे आमचं स्वप्न होतं. गेल्या सहा महिन्यात आम्ही देशासाठी पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होताना दिसत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकही ऐतिहासिक विधेयक आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडेल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.


लोकसभेत नागरिकत्व विधेयक मंजूर


लोकसभेत नागरिकत्व विधेयक मंजूर झालं आहे. लोकसभेत विधेयक मंजूर करुन घेणे भाजपला सोपं गेलं. लोकसभेत विधेयकाच्या बाजून 311 मतं तर विरोधात 82 मतं पडली. भाजपसह बीजेडी, एलजेपी, अकाली दल, जेडीयू, YSRCP, NDPP, MNF, NPF, NPP, PMK या पक्षांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. काँग्रेस, टीएमसी, डीएमके, राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, एआयएम, सीपीआय, AIUDF, RSP, SKM या पक्षांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं.


लोकसभेत मंजुरीनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर केलं जाणार आहे. राज्यसभेतील या विधेयकाचा मंजुरीचा मार्ग सोपा नसेल. या विधेयकावर चर्चेसाठी सहा तासांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. आज दुपारी दोन वाजता या विधेयकावर चर्चा सुरु होणार आहे.



शिवसेनेने भूमिका बदलली


लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला काल पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेने आपली भूमिका बदलली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत राज्यसभेत विधेयकाला समर्थन देणार नाही. तसेच राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर विस्ताराने चर्चा होणे अपेक्षित आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केलं. नागरिकत्व विधेयकाबाबत काही प्रश्न आहेत. सरकारने सर्व शंकांचं निरसन करावं. चर्चेनंतर भूमिक स्पष्ट करु, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.



संबंधित बातम्या