मुंबई : लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला काल पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेने आज आपली भूमिका बदलली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत राज्यसभेत विधेयकाला समर्थन देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. काल नागरिकत्व दुरुस्ती विधेयकासंदर्भात इतर पक्षांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. मात्र जे प्रश्न शिवसेनेने उपस्थित केले, त्याला अमित शाह यांनी उत्तर दिलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे जोपर्यंत आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळणार नाही तोपर्यंत शिवसेना या विधेयकाला समर्थन देणार, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.


नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करणाऱ्यांना आणि पाठिंबा देणाऱ्यांना हे विधेयक कळलं आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा या विधेयकामधील सत्यता आणि स्पष्टता लोकांसमोर मांडली पाहिजे. नव्याने नागरिकत्व मिळालेले नागरिक कोणत्या राज्यात राहणार आणि त्यांची जबाबदारी कोण घेणार? याची स्पष्टता प्रत्येक राज्याला कळली पाहिजे. देशामध्ये जे एक वातावरण केलं जात आहे की लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडून जे काही आणलं जातं, त्याच्या बाजूने मतदान करणे म्हणजेच देशभक्ती आणि त्याला विरोध करणे म्हणजे देशद्रोह या भ्रमातून सर्वांनी प्रथम बाहेर यायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.


राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर विस्ताराने चर्चा होणे अपेक्षित आहे. हा केवळ एका पक्षाचा विषय नसून राष्ट्राचा मुद्दा आहे. त्यामुळे यामध्ये मतांचं राजकारण यामध्ये झालं तर ते चुकीचं आहे. नव्याने नागरिकत्व ज्यांना मिळेल त्यांची पार्श्वभूमीची योग्य पद्धतीने तपासणी होणे गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना भारतीय नागरिकांचे अधिकार मिळायला हवेत, अशी शिवसेनेची मागणी आहे. देशाच्या भवितव्याचा विचार करायचा असेल तर या विधेयकावर विस्ताराने चर्चा झाली, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. देशातील नागरिकांसमोरील रोजच्या जीवनातील आवश्यक प्रश्न सोडवणं अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही काय भूमिका घ्यावी, हे आम्हाला कोणी सांगू नये, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.



शिवसेना मतदान करण्याऐवजी अलिप्त राहू शकली असती : हुसेन दलवाई


नागरिकत्व दुरुस्ती विधेयक काल लोकसभेच मंजूर झालं. विधेयकाच्या बाजूने 311 सदस्यांनी मतदान केले तर विरोधात 80 सदस्यांनी मतदान केले. मात्र शिवसेना विधेयकाच्या विरोधात मतदान करणार असं वाटत असताना शिवसेने विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. त्यावर शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान का केलं माहित नाही. शिवसेना नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याऐवजी अलिप्त राहू शकली असती. शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूने मतदान केलं हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी दिली.


EXPLAINER VIDEO | सिटीझनशिप अमेंडमेंट बिल कायदा काय आहे? इतिहास आणि राजकारण



संबंधित बातम्या