नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाने पुन्हा पुन्हा हिंसक वळण घेतलं आहे. दिल्लीत जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली असून पोलिसांकडूनही अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एवढचं नाहीतर अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे.


आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात सीलमपूरहून आंदोलकांच्या आंदोलनाला सुरुवात झाली . त्यानंतर जाफराबादमध्ये या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे.


एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनानं हिंसक वळण घेतल्यानंतर दिल्लीतील पाच मेट्रो स्टेशन्स बंद ठेवली आहेत. जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, सीलमपूर, वेलकम आणि गोकुलपूर ही मेट्रो स्टेशन्स बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोनल सुरु आहे. या आंदोलनानं रविवारी हिंसक वळण घेतलं. आंदोलक विद्यार्थ्यांनी तीन बस आणि काही दुचाकी पेटवल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त विद्यापीठ परिसरात तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आहे. आप नेते अमानुतुल्ला यांच्यावर हिंसा भडकावण्याच आरोप करण्यात येत आहे, मात्र त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या आसाम, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीमसह सात राज्यात प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. हे विधेयक संसदेत मांडल्यापासूनच याला विरोध सुरु झाला होता. विधेयकाच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याची तीव्रता अधिक वाढली आहे.


अलीगड मुस्लीम विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झडप झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अलीगड मुस्लीम विद्यापीठात तणाव वाढला होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत काही सुरक्षारक्षकही जखमीही झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठ परिसरातील सर्व रस्ते बंद केले होते. विद्यापीठातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन वातावरण शांत होईपर्यंत विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व हॉस्टेल्सही खाली करण्यात येणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्राध्यापक अफीफ उल्लाह खान यांनी दिली.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर या विधेयकाला राष्ट्रपतींनीही मंजुरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता नागरिकत्व संशोधन विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं आहे. या विधेयकामुळे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातील सहा समुदायातील लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि इसाई या सहा समुदायातील लोक जे 31 डिसेंबर, 2014 आधी भारतात आले आहेत, त्यांना सरसकट भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.

संबंधित बातम्या : 

जामियातील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं अपयश; सुप्रिया सुळेंची टीका

Jamia Protests | जामिया हिंसाचारप्रकरणी दहा जण अटकेत, एकही विद्यार्थी नाही

CAA Protest : हिंसक आंदोलनं दुर्दैवी, समता टिकवणं गरजेचं; मोदींचं आवाहन