बारामती येथील रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या कामांची सुप्रिया सुळे यांनी आज पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. ग्रंथालयं हे शांततेचं ठिकाण आहे. मात्र, दिल्लीत ग्रंथालयात जाऊन विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला गेला. दिल्लीत सुरु असलेला हिंसाचार हा देशाच्या गृह मंत्रालयाचं मोठं अपयश असल्याचं सांगत गृहमंत्र्यानी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
सरकार मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करतंय -
देशापुढे अनेक प्रश्न निर्माण झालेले असताना केंद्रातले सत्ताधारी आणि राज्यातले विरोधक नको त्या विषयांना महत्व देऊन जनतेचं अन्यत्र लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली. राज्यातल्या सरकारचं पहिलंच अधिवेशन होतंय. त्यामध्ये चांगली चर्चा होणं अपेक्षित आहे. मात्र, विरोधकांकडून कोणतीही चर्चा न करता गोंधळ घालतायत. मागील पाच वर्षांत त्यांनी केलेल्या गोंधळाचं सत्य बाहेर येण्याची भीती असल्यामुळे त्यांच्याकडून गोंधळ घातला जातोय काय अशी शंकाही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलीय.
मुंबईला बुलेट ट्रेनपेक्षा सुरक्षिततेची अधिक गरज -
मुंबईतल्या लोकल रेल्वेवर असणारा भार लक्षात घेता सुरक्षितेकडे अधिकचं लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. मुंबईला बुलेट ट्रेनपेक्षा सुरक्षिततेची अधिक गरज आहे. बुलेट ट्रेनचा सगळा निधी मुंबई उपनगरांसाठी द्यावा अशी आपली मागणी आहे. याबाबत आपण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
महात्मा गांधींचं नाव घ्यायचा राहुल गांधींना अधिकार नाही, सत्तेसाठी शिवसेनेने जनतेचा विश्वासघात केला : राम नाईक
Jamia Protests | जामिया हिंसाचारप्रकरणी दहा जण अटकेत, एकही विद्यार्थी नाही
Delhi | जामियातील दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात प्रियांका गांधींचं ठिय्या आंदोलन | ABP Majha