मुंबई: आजचा दिवस इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठा सत्ता उत्तरेत ज्यांनी भक्कम केली त्या पहिल्या बाजीरावाचा आज जन्मदिन. तसेच विज्ञानाच्या एका मोठ्या शोधाचा साक्षीदार सिंधुदुर्गातील विजयदुर्ग किल्ला ठरला आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट 1868 रोजी, विजयदुर्गवर हेलियमचा शोध लावण्यात आला.
यासह इतिहासात आज घडलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना पुढीलप्रमाणे,
1700- पहिल्या बाजीरावाचा जन्मदिन
मराठा साम्राज्यातील लढवय्या पहिल्या बाजीरावचा (Bajirao 1) आज जन्मदिन आहे. पहिल्या बाजीरावचा जन्म 18 ऑगस्ट 1700 रोजी श्रीवर्धन या ठिकाणी झाला होता. पहिल्या बाजीरावाने दिल्ली आणि भोपाळच्या लढाईमध्ये पराक्रम गाजवला. उत्तरेत आणि दक्षिणेत मराठा साम्राज्याची घडी बसवण्यात पहिल्या बाजीरावचा मोठा वाटा होता. प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने 28 एप्रिल 1740 रोजी पहाटे वयाच्या फक्त 40 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
1841 - जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.
1868- विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला
18 ऑगस्ट हा 'जागतिक हेलियम दिवस' (Helium Day) म्हणून साजरा केला जातो. 1868 मध्ये या दिवशी सूर्यावर हेलियम गॅस असल्याचे निरीक्षण केले गेले. ग्रीक देव 'हेलियस'च्या नावावरून हेलियम हे नाव पडले. सर जोसेफ नॉर्मन लॅकियर विजयदुर्ग किल्ल्यावरून (Vijaydurg Fort) सूर्यग्रहणाचे निरीक्षण करत होते. त्यामुळे हेलियमच्या शोधाचे श्रेय या जागेला जाते. नॉर्मन ज्या कट्ट्यावरून दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण करीत होते, तो आजही साहेबाचा कट्टा म्हणून ओळखला जातो.
1900- विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्मदिवस
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित (Vijaya Lakshmi Pandit) यांचा आज जन्मदिवस आहे. विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म 18 ऑगस्ट 1900 रोजी झाला. त्या पंडित नेहरुंच्या भगिनी होत्या. गांधीजींच्या प्रभावाने त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला. विजयालक्ष्मी पंडित या प्रत्येक चळवळीत पुढे असायच्या, तुरुंगात जायच्या आणि सुटका झाली आणि पुन्हा आंदोलनात सहभागी व्हायच्या. 1953 ते 1954 या काळात त्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या आठव्या अध्यक्षा होत्या.
1920 - अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार
पुरुषांच्या सोबत आपल्यालाही मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी अमेरिकेतल्या स्त्रियांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आणि 18 ऑगस्ट 1920 साली अमेरिकेतल्य स्त्रियांना मतदानाचा अधिकार (Voting Rights For Women) देण्यात आला.
1945 - इंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्षपदी सुकार्नो
इंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्षपदावर सुकार्नो (Indonasia President Sukarno) यांची निवड झाली. सुकार्नो यांनी डचपासून इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिकी साकारली. सुकार्नो हे अलिप्तवादी चळवळीचे (NAM) नेते असून त्यांनी पंडित नेहरु आणि युगोस्लाव्हियाच्या मार्शल टिटो यांच्या सोबतीने तिसऱ्या जगाचे नेतृत्व केलं. 1945 ते 1967 या दरम्यान ते अध्यक्षपदावर होते.
1951- आयआयटी खरगपूरची स्थापना
आजच्याच दिवशी, 18 ऑगस्ट 1951 रोजी देशातील पहिल्या आयआयटीची स्थापना पश्चिम बंगालमधील खरगपूरमध्ये (Indian Institute of Technology Kharagpur) करण्यात आली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या आयआयटीने देशात उच्च शिक्षणाचा पाया मजबूत केला.
1958 - बांग्लादेशचे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले.
1963 - जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून पदवी घेणारा पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती ठरला.
1999- तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपात सुमारे 45,000 लोक मरण पावले.
1999- तुरुंगवास भोगत असलेल्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाने मतदानाचा अधिकार नाकाला
कोणताही गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या अथवा कोणत्याही कारणासाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
2008- महाभियोगाच्या भीतीने पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.
2012- नाटोच्या हवाई हल्ल्यात 13 अफगाण दहशतवादी मारले गेले.