नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू आहे. मतमोजणी आणि निकालात गडबड होत असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलानं केला आहे. जिंकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रं दिली जात नाही, असाही आरोप राजदने केला आहे.


विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं असा आरोप राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. एवढचं नाही तर नितीश कुमार हे मतमोजणी प्रक्रियेवर दबाव टाकत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं एक शिष्ट मंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहचलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे मतमोजणीच्या प्रक्रियेवर दबाव टाकत आहेत असा आरोप देखील या शिष्टमंडळाने केला आहे.





राजदच्या ट्विटर हँडलवरुन निवडणूक आयोगाने दिलेली यादी ट्वीट करण्यात आली आहे. मतमोजणी पूर्ण झालेल्या 119 जागांचे निकाल हाती आले आहेत. ज्या ठिकाणी महाआघाडीचे उमेदवार जिंकले आहेत तिथे त्यांना विजयाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. मात्र आता त्यांना सांगण्यात येतं आहे की तुम्ही हरले आहात आणि विजयी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरही महाआघाडीच्या या उमेदवारांना विजयी दाखवण्यात आलं आहे. मात्र त्यांना प्रमाणपत्र नाकारण्यात येतं आहे आणि तुमचा पराजय झाला असे सांगण्यात येत आहे.


राजदने आपल्या दुसऱ्या ट्वीट म्हटले आहे की, नितीश कुमार, सुशील मोदी मुख्यमंत्री निवासस्थानात बसून सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. महागठबंधनला कोणत्याही परिस्थितीत 105-110 जागांवर रोखण्याच्या सूचना दिल्या जात आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत लोकशाहीची ही लूट चालणार आहे.