Bihar Election Result : बिहारमध्ये महागठबंधननं 110 जागा जिंकल्या आहेत. यात तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राजदनं 75 जागा मिळवल्या आहेत. राजदला 2015 साली 80 जागा मिळाल्या होत्या. पाच जागा यंदा कमी मिळाल्या असल्या तरी तेजस्वी यांचं हे एकट्याच्या बळावर आणलेलं यश मानलं जात आहे. तर गेल्यावेळी 27 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी आठ जागांवर फटका बसला असून 19 जागा मिळाल्या आहेत. राजद आणि काँग्रेसनं 2015च्या जागांचे आकडे गाठले असते तर कदाचित बहुमत त्यांना मिळाले असते.


महागठबंधनमध्ये आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) 144 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 50 टक्क्यांहून अधिक जागांवर तेजस्वी यादवांच्या नेतृत्वात राजदनं विजय मिळवला. तर त्यांच्यासोबत असलेल्या काँग्रेसनं 70 जागांवर निवडणूक लढवली मात्र केवळ 19 जागा ते जिंकू शकले.  CPI-(एमएल) 19 जागांवर निवडणूक लढवून 12 जागा जिंकले. काँग्रेसच्या विजयाची सरासरी सर्वात कमी राहिली याचा फटका सरळ तेजस्वी यादव यांना बसला. जर तेजस्वी यादव एकटे स्वबळावर लढले असते तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.


31 वर्षांच्या तरुणानं भल्याभल्यांना घाम फोडला


बिहारच्या निवडणुकीत एनडीएनं सत्ता तर मिळवली मात्र अवघ्या 31 वर्षांच्या तरुणानं भल्याभल्यांना घाम फोडला. आकड्यांच्या शर्यतीत तेजस्वी यादव भलेही हरले असतील मात्र लोकांची मनं त्यांनी जिंकली आहेत.  बिहारच्या या प्रचारात सर्वात चर्चिली गेलेली कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे तेजस्वी यांचा झंझावाती प्रचार सभा. 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 21 दिवसांत तेजस्वी यादव यांनी तब्बल 251 सभा केल्यात. म्हणजे दिवसाला सरासरी 12 सभा त्यांनी केल्या.  बिहारमध्ये सर्वच्या सर्व 243 विधानसभा मतदारसंघात सभा करण्याचं त्यांचं लक्ष्य होतं आणि त्यांनी ते जवळपास पूर्ण केलं.


आपली परीक्षा मानत घेतले अथक परिश्रम
तेजस्वी यादव यांनी ही निवडणूक म्हणजे आपली परीक्षा मानत त्यासाठी अथक परिश्रमही घेतले. हेलिकॉप्टरमधून सभास्थळी पोहचायचं. वेळ वाचवण्यासाठी धावत स्टेजकडे पोहचायचं. प्रचंड उत्साहानं भारलेल्या गर्दीशी संवाद साधत भाषण करायचं. आणि या गर्दीचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्वीकारत पुन्हा दुसऱ्या सभेसाठी धावतच धूम ठोकायची. गेली 21 दिवस तेजस्वी यांचा केवळ हाच दिनक्रम सुरु होता. तेजस्वी यादव यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे एक वेगळं आव्हान होती. कारण लालू प्रसाद यादव यांच्याविना ही पहिली निवडणूक.  निवडणूक लढताना तेजस्वी यांनी आपण लालूंच्या छायेतून पूर्णपणे बाहेर आल्याचं सिद्ध केलं. दुसऱ्या पिढीतल्या राजकारण्यांनी आपली पाटी कशी कोरी करावी याचं उदाहरणच त्यांनी या निवडणुकीतून दाखवून दिलंय.


तेजस्वी यादवांचा इलेक्शन फॉर्म्युला




  • जंगलराजच्या मुद्द्याला विकासाच्या मुद्द्यानं उत्तर दिलं

  • लालू प्रसाद यादवांच्या सावलीतून बाहेर पडत नेतृत्व सिद्ध केलं

  • स्थलांतराच्या मुद्द्याचा पुरेपूर वापर केला

  • नितीश कुमारांविरोधातल्या नाराजी वापरण्याच यश मिळवलं

  • मित्रपक्षांना सोबत ठेवत स्वत:चं नेतृत्व सिद्ध केलं

  • प्रचारात पंतप्रधान मोदींवर तिखट टीका नाही केली

  • बिहारच्या निवडणुकांत फक्त राज्यातल्याच मुद्द्यांवर भाष्य केलं

  • जातीय समीकरणांच्या बाहेर पडून विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला.

  • नोकऱ्यांच्या मुद्द्यांवर तरुणांना जोडण्यात यश मिळवलं


जंगलराजचा मुद्दा विरोधक सातत्यानं छेडणार त्यामुळे प्रचारात लालू-राबडी यांचे फोटो न वापरण्याचा धाडसी निर्णय घेतला गेला. अगदी राजदच्या जाहीरनाम्यातही लालूंचा छोटाही फोटो नव्हता. ही सगळी जाणूनबुजून आखलेली रणनीती होती.  त्यामुळेच पंतप्रधान जंगलराज का युवराज म्हणून टीका करत राहिले तर तेजस्वी संयमानं या टीकेला हाताळत राहिले. आकड्यांच्या गणितात तेजस्वी हरले असले तरी एकहाती प्रचारामध्ये मात्र जिंकले आहेत. त्यांचे हे आकडे सत्तास्थापनेसाठी पुरेसे नसतीलही पण राजकारणातल्या भक्कम पायाभरणीसाठी पुरेसे आहेत.


नितीशकुमारांच्या जदयूला मोठा फटका
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने 125 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे.  सर्व 243 जागांचे निकाल हाती असून NDA ने 125 जागा जिंकल्या आहेत तर महागठबंधननं 110 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने या निकालात भरारी घेतली. निकालानंतर भलेही जदयूचे नितीशकुमार मुख्यमंत्री होतील मात्र त्यांचा पक्ष जदयूला खूप मोठा फटका या निवडणुकीत बसला आहे. 2015 साली 71 जागा जिंकलेल्या जदयूला यावेळी फक्त 43 जागांवर विजय मिळवता आला आहे. बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळालं आहे आणि नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं असलं तरी पक्षपातळीवर नितीशकुमारांचं मोठं नुकसान झालं आहे.


बिहारमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या


एनडीए-125
भाजप-74
जेडीयू-43
विकासशील इंसान पार्टी-04
हिन्दुस्तानी अवाम मोर्चा-04


महागठबंधन-110
आरजेडी-75
काँग्रेस-19
भाकपा-माले-12
सीपीएम-02
सीपीआय-02


एएमआयएम - 5
बहुजन समाज पार्टी - एक
लोक जनशक्ति पार्टी - एक
अपक्ष - एक



संबंधित बातम्या


निवडणूक प्रक्रियेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; राजदचा गंभीर आरोप


Bihar Election: जर भाजपने अवलंबला '1995 चा महाराष्ट्र फॉर्म्युला' तर नितीश कुमारांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात


Bihar Results 2020 | बिहारमध्ये एनडीएला बहुमत तर राजद सर्वात मोठा पक्ष


बिहारमध्ये चुरशीच्या निकालानंतर NDA चीच सत्ता, पंतप्रधान म्हणाले, 'हा लोकशाहीचा विजय'