KCR Party EX Mla German Citizen : देशातील कोणताही नागरिक त्या त्या राज्यात विधानसभेची निवडणूक लढवू शकतो किंवा देशाच्या कोणत्याही भागातून लोकसभेची निवडणूक लढवू शकतो. पण एखादा दुसऱ्याच देशाचा नागरिक आला आणि भारतात आमदार झाला तर? होय, असाच एक प्रसंग तेलंगणामध्ये घडला असून जर्मनीचा नागरिक असलेल्या व्यक्तीने तेलंगणामध्ये तब्बल चार वेळा आमदारकी भोगली आहे. चेन्नामनेनी रमेश असं त्या व्यक्तीचं नाव असून त्याचे जर्मन नागरिकत्व उघडकीस आल्यानंतर त्याला उच्च न्यायालयाने 30 लाखांचा दंड ठोठावला आहे.   


चेन्नामनेनी रमेश हे तेलंगणातील चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पार्टीचे आमदार होते. रमेश हे सर्वप्रथम 2009 साली वेमुलावाडा मतदारसंघातून टीडीपीच्या तिकिटावर आमदार झाले. त्यानंतर 2010 ते 2018 या दरम्यान बीआरएसच्या तिकिटावर तीन वेळा निवडणूक लढवली आणि आमदार झाले. 


चार वेळा आमदार झाले


तेलंगणा उच्च न्यायालयाने सोमवारी (09 डिसेंबर 2024) काँग्रेस नेते आदी श्रीनिवास यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल दिला. उच्च न्यायालयाने म्हटलंय की,  "बीआरएसचे माजी आमदार चेन्नामनेनी रमेश हे जर्मन नागरिक आहेत आणि त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून, वेमुलवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी स्वत:ला भारतीय नागरिक म्हणून सादर केले. या काळात ते जर्मन नागरिक नव्हते याबाबतची कोणतीही कागदपत्रे सादर करण्यास ते अयशस्वी ठरले. 


न्यायालयाने चेन्नामनेनी रमेश यांना 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या रकमेपैकी 25 लाख रुपये हे काँग्रेस नेते आणि याचिकाकर्ते श्रीनिवास यांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या विरोधात चेन्नामनेनी रमेश नोव्हेंबर 2023 च्या निवडणुकीत हरले होते.


परदेशी नागरिक भारतात निवडणूक लढवू शकत नाही


न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "रमेश याआधी वेमुलवाडा मतदारसंघातून चार वेळा विजयी झाले होते. 2009 मध्ये तेलुगु देसम पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले. नंतर पुन्हा 2010 ते 2018 या दरम्यान ते तीन वेळा आमदार झाले. आपल्या देशातील कायद्यानुसार, भारताचा नागरिक नसलेला व्यक्ती या देशातील कोणतीही निवडणूक लढवू शकत नाही किंवा मतदान करू शकत नाही."


काय आहे संपूर्ण प्रकरण?


सन 2020 मध्ये, केंद्राने तेलंगणा उच्च न्यायालयाला कळवले होते की चेन्नामनेनी रमेश यांच्याकडे जर्मन पासपोर्ट आहे. तो 2023 पर्यंत वैध आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आधीच त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. कारण त्यांनी निवडणुकीच्या अर्जात ही माहिती लपवली होती.


गृह मंत्रालयाने म्हटलं होतं की, चेन्नामनेनी रमेश यांनी खोटी माहिती दिल्यामुळे भारत सरकारची दिशाभूल झाली आहे. यानंतर रमेश यांनी गृहमंत्रालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली.


त्यानंतर चेन्नामनेनी रमेश यांना त्यांच्या जर्मन पासपोर्टच्या आत्मसमर्पणाचे तपशील आणि त्यांनी आपले जर्मन नागरिकत्व सोडल्याचे प्रमाणित करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते.