हे संपूर्ण प्रकरण चेन्नईमधील आहे. बालामुरुगन दीनदयालन नावाच्या व्यक्तीने स्विगीवरुन नॉनवेज जेवण ऑर्डर केलं होतं. जवळपास अर्ध जेवण झाल्यानंतर बालामुरुगनला जेवणाच्या पाकिटात रक्त लागलेलं बॅण्डेज सापडलं. यानंतर बालामुरुगनने याबाबत रेस्टॉरंटकडे तक्रार केली, परंतु त्यावर हॉटेलकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
या सगळ्या प्रकारानंतर बालामुरुगनने स्विगीला टॅग करत फेसबुक पोस्ट लिहिली. "शी, अर्ध जेवण खाल्ल्यानंतर मला हे रक्त लागलेलं बॅण्डेज मिळालं. मी रेस्टॉरंटशी संपर्क केला, पण त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही. ते एवढंच म्हणाले की, आम्ही दुसरं जेवण पाठवतो. असं वाईट जेवण पुन्हा कोण खाईल. मी स्विगीशी बोलण्याचाही प्रयत्न केला. पण जेवणाची डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांच्याशी कॉलवरुन थेट बोलण्याचा कोणताही पर्याय नाही. त्यांच्यासोबत केवळ चॅटवर बोलता येतं, पण ते तिथेही उत्तर देत नाही."
'खटला दाखल करणार'
मला रेस्टॉरंट आणि स्विगी या दोघांवर खटला चालवायचा आहे. कारण स्विगीने अशा रेस्टॉरंटसोबत भागीदारी केली आहे, जे स्वच्छतेच्या छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी घेत नाही. उदाहरणार्थ हॅण्ड ग्लोव्जचा वापर, बोटांना जखम झाली तर कर्मचाऱ्यांना किचनमध्ये येण्यास मज्जाव घालणं," असं बालामुरुगनने पुढे लिहिलं आहे.
यानंतर स्विगीने बालामुरुगन दीनदयालन यांच्या या पोस्टवर स्पष्टीकरण दिलं आहे. स्विगीने माफी मागत सांगितलं की, "आम्ही या प्रकरणाची कसून चौकशी करु आणि हे नेमकं कसं घडलं, याबाबत रेस्टॉरेंटशी बोलू."