African Cheetahs in India : चित्ता... (Cheetah) पृथ्वीतलावरचा सर्वात वेगवान प्राणी. गेल्या 70 वर्षांपासून भारतात हा प्राणी नामशेष झाला होता. पण आता ही कमतरता भरुन काढली जाणार आहे. कारण थेट दक्षिण आफ्रिका (South Africa), नामिबियामधून (Namibia) 8 ते 12 चित्त्यांचं पहिलं पथक भारतात दाखल होत आहे. 13 ऑगस्टला हे चित्ते आफ्रिकेतून पूर्ण तयारीनिशी, सर्व काळजी घेऊन अगदी लसीकरण करुन भारतात दाखल होणार आहेत.
1952 साली भारतात छत्तीसगडमध्ये म्हणजे तेव्हाच्या मध्य प्रदेशात शेवटच्या चित्त्याची शिकार झाल्याची नोंद आहे. त्यानंतर भारतातून हा प्राणी नामशेष झाला. आता दक्षिण आफ्रिकेतून भारतात चित्त्याचं हे स्थलांतर जगातलं एका खंडातून दुसऱ्या खंडात होणारं सर्वात मोठं स्थलांतर मानलं जात आहे.
चित्ता हा मांजरवर्गीय कुळातला प्राणी...चपळ पण अनेकदा बिबट्याशी संघर्षात कमी पडतो. चित्त्याची लहान पिलं बिबट्याची भक्ष्य देखील बनतात. भारतात हा चित्ता वाढावा, टिकावा यासाठी बरेच काळजीने प्रयत्न केले जाणार आहेत. शिवाय त्याचा प्रवास कसा होणार आहे हे पाहिलंत तर तुम्ही थक्क व्हाल.
आफ्रिकेतून भारतात कसे येणार आहेत चित्ते?
- साऊथ आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग विमानतळावरुन मालवाहू विमानातून हे चित्ते आधी दिल्लीत आणले जातील
- त्यानंतर दिल्लीहून त्यांना मध्य प्रदेशातल्या कुन्हो नॅशनल पार्कमध्ये आणलं जाणार आहे
- अनेकदा अशा प्रवासात चित्ते दगावण्याची भीती असते, त्यामुळे खूप काळजी घेऊन हे मिशन पार पाडावं लागणार आहे
- विमान प्रवासात त्यांना उलट्या होतात, त्यामुळे प्रवासाच्या आधी किमान एक दिवस त्यांना खाऊ घातलं जाणार नाही
- कुठलाही संसर्ग होऊ नये यासाठी त्याचं पूर्ण लसीकरण केलं जाणार आहे
- प्रवासात त्यांना बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन आणलं जाणार आहे.
- मध्य प्रदेशातल्या कुन्हो नॅशनल पार्कमध्ये या चित्त्यांसाठी विशेष क्षेत्र तयार केलं जातंय, तिथे पाणी, त्यांच्यासाठी शिकारी सहज उपलब्ध होतील अशी रचना केली जात आहे.
दक्षिण आफ्रिकेतून 16 चित्ते आणण्याची योजना
जगात एकूण सात हजारच्या आसपास चित्ते आहेत. त्यापैकी तब्बल दोन तृतीयांश चित्ते हे एकट्या साऊथ आफ्रिकेतच आढळतात. एकूण 16 चित्ते भारतात आणण्याची योजना आहे. त्यासाठी सुप्रीम कोर्टातून परवानगीही मिळालेली आहे. या 16 पैकी हे पहिलं पथक 13 ऑगस्टला दाखल होईल.
चित्त्यांना भारतीय भूमी मानवणार?
वाऱ्याच्या वेगाने स्वार होणं हे चित्त्याचं नैसर्गिक कसब. पण काहीसा नाजूक हृदयाचा हा प्राणी सहसा संघर्ष टाळण्याच्याच बेतात असतो. अनेकदा सिंह, बिबट्या हे आपल्या दडपशाहीने चित्त्यांची संख्या मर्यादित ठेवतात. त्यातही चित्त्याची पिलं तर यांची शिकार बनतात. त्यामुळेच आता कुन्होमध्ये आल्यानंतर या चित्त्यांची नैसर्गिक वाढ किती वेगाने होते, त्यांना भारताची ही भूमी किती मानवते हेही पाहणं महत्त्वाचं असेल. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात 1952 पासून जी उणीव होती..ती मात्र या निमित्ताने पूर्ण होतेय हे खरं.