श्रीहरिकोटा : भारताची महत्त्वकांक्षी मोहिम चांद्रयान - 3 (Chandrayan - 3) आता फक्त एकच पाऊल  मागे आहे. पुढील 28   तासांमध्ये हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. बुधवार 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग होणार असल्याचं इस्रोकडून सांगण्यात येत आहे.  त्यासाठी इस्रोचे (ISRO) शास्रज्ञ तयार असून विक्रम लँडरची स्थिती पाहून या यानाचे चंद्रावर लँडिंग करण्यात येणार आहे. तसेच आता हे यान यशस्वीरित्या चंद्रावर उतरणार असल्याचा विश्वास देखील इस्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाचे लँडिंग करण्यात येणार आहे. 


दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणे कठीण


चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा बाजू ही अत्यंत खडतर आहे. इथे अनेक खड्डे आहेत. त्यामुळे चंद्राच्या या भागावर चांद्रयानाचे लँडिंग करणं हे इस्रोसाठी आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे इस्रोच्या शास्रज्ञांनी या यानाची रचनाचा अशा प्रकारे केली आहे की या सर्व परिस्थितीमध्येही हे यान लँडिंग करण्यास सक्षम असेल. तसेच याच परिस्थितीमुळे यानामध्ये जास्त इंधनसाठा देखील समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच हे यान देखील मजबूत करण्यात आले आहे जेणेकरुन कोणत्याही परिस्थितीमध्ये यानाला धक्का पोहचणार नाही. 


चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणार भारत पहिला देश


आतापर्यंत तीन देशांनी आपली चांद्रमोहिम यशस्वी केली आहे. त्यामध्ये रशिया, अमेरिका आणि चीन या देशांचा समावेश आहे. पण यापैकी कोणत्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवले नव्हते. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवणारा पहिला देश ठरणार आहे. दक्षिण ध्रुवावर भारताचे यान उतरुन तेथील संशोधन करणार आहे.  तसेच तेथील माहिती ते इस्रोकडे पाठणार आहे. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत याचा शोध भारत लावणार आहे. 


...तर 27 ऑगस्टला होऊ शकते लँडिग


इस्रोच्या अहमदाबाद केंद्राचे प्रमुख निलेश एम देसाई यांनी चांद्रयान - 3 संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. 23 ऑगस्ट रोजी लँडिंगच्या काही तास आधी हा निर्णय घेण्यात येईल की, लँडिंगसाठी ही वेळ योग्य आहे की नाही. तसेच हे लँडिंग मॉड्यूलची स्थिती आणि चंद्रावरील परिस्थितीवर देखील अवलंबून आहे. जर परिस्थिती अनुकूल नसेल तर हे लँडिंग 27 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. परंतु 23 ऑगस्ट रोजी लँडिंगसाठी कोणतीही समस्या येणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 


भारताच्या या महत्त्वकांक्षी मोहिमेचं श्रीहरिकोटा येथून 14 जुलै रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आलं होतं. आता अगदी काहीच तासांमध्ये हे यान चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे संपूर्ण भारतीय या सुवर्णक्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. 


हेही वाचा : 


Chandrayaan-3 : चांद्रयान-3 शोधतंय लँडिंगसाठी सुरक्षित जागा, उरले फक्त 48 तास; इस्रोकडून लँडिंगसाठी तयारी पूर्ण