भारत : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील जोहानिसबर्गमध्ये होणाऱ्या 'ब्रिक्स शिखर परिषदे'मध्ये सहभागी होणार आहेत. त्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेला (South Africa) रवाना झाले आहेत. 'ब्रिक्स'च्या (BRICS) या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक देशांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.


तसेच या बैठकीमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी हे समोरासमोर येणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु अजूनही राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत कोणत्याही प्रकराच्या बैठकीच्या नियोजनाबाबत माहिती देण्यात आली नाही. दक्षिण आफ्रिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रीसच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 


असा असणार पंतप्रधानांचा दौरा


पंतप्रधानांच्या कार्यालयाने त्यांच्या दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जोहानिसबर्गमध्ये होणाऱ्या 15 व्या शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ते 24 ऑगस्टपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असणार आहेत. 


या परिषदेमध्ये काही देशांच्या नेत्यांसोबत पंतप्रधान द्विपक्षीय बैठक करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यानंतर ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकीस यांच्या निमंत्रणामुळे पंतप्रधान मोदी हे ग्रीसचा देखील दौरा करणार आहेत. तसेच 40 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान हे ग्रीसच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 






कोरोनानंतर ब्रिक्सची पहिलीच प्रत्यक्ष बैठक


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेतील जोहानिसबर्गमध्ये 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. ब्रिक्स (BRICS) मध्ये समाविष्ट असलेल्या देशांची कोरोनानंतर ही पहिलीच प्रत्यक्ष बैठक आहे. यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. कोरोनाच्या काळामध्ये ही बैठक ऑनलाईन माध्यमातून झाली होती. परंतु आता कोरोनानंतर ही पहिलीच प्रत्यक्ष बैठक पार पडणार आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींनी सर्व देशांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रित केले आहे. 


राष्ट्रपती जिनपिंगसोबत बैठक होणार?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याविषयी परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. यादरम्यान परराष्ट्र सचिवांना विचारण्यात आले की, 'या परिषदेदरम्यान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा होणार का?' यावर परराष्ट्र सचिव क्वात्रा यांनी सांगितले की, 'पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे.' जर दक्षिण आफ्रिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत बैठक झाली तर  मे 2020 पासून सुरु असलेल्या पूर्व लडाखमधील सीमावादानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिली बैठक असणार आहे.  


हेही वाचा : 


डिजिटल इंडियाचे आणखी एक पाऊल पडते पुढे; AI आधारित 'Bhashini' प्लॅटफाॅर्मची पीएम मोदींची घोषणा