भारत : दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) राष्ट्रपती साईरिल रामफोसा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह इतर देशांतील मान्यवरांना ब्रिक्स (BRICS) परिषदेसाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान कोविड महामारीनंतर ही पहिलीच प्रत्यक्ष परिषद होणार आहे. त्यामुळे या परिषदेच्या दरम्यान अनेक देशांच्या प्रमुख नेत्यांची द्वीपक्षीय बैठक देखील पार पडणार आहे. पण आता प्रश्न असा निर्माण होतो की या ब्रिक्सचा नेमका अर्थ काय? किंवा अजून किती देश यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत?  याचविषयी सविस्तर जाणून घेऊया. 


'ब्रिक्स'चा नेमका अर्थ काय?  


ब्रिक्स हा शब्द यामध्ये सामील असलेल्या देशांच्या पहिल्या अक्षरांवरुन तयार करण्यात आला आहे. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. या देशांच्या इंग्रजी नावातील पहिल्या अक्षरापासून हा शब्द तयार करण्यात आला आहे. म्हणजे ब्राझील (B), रशिया (R), इंडिया (I), चीन (C), साऊथ आफ्रिका (S) यांपासून ब्रिक्स (BRICS) हा शब्द तयार करण्यात आला आहे. 


2001 मध्ये ब्रिक्सची स्थापना करण्यात आली.  ब्राझील, रशिया, भारत आणि चीनच्या विकास दराकडे लक्ष वेधण्यासाठी सुरुवातीला ब्रिकची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेला देखील यामध्ये सामील करुन घेण्यात आले. त्यानंतर या ब्रिकची रचना ब्रिक्समध्ये करण्यात आली. जगामध्ये गुंतवणूकदारांसाठी ब्रिक्स आहे एक मोठा आशावाद असल्याचं मानलं जातं. कारण या देशांमधील गुंतवणूकीचा जागतिक बाजारपेठांवर परिणाम होत असल्याचं सांगण्यात येतं. 


ब्रिक्सच्या देशांचं विशेषत्व काय?


ब्रिक्समध्ये सामील असलेल्या देशांचं एक विशेष महत्त्व आहे. कारण यामध्ये सामील असलेल्या देशांची अर्थव्यवस्था ही विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या देशांतील अर्थव्यवस्था जगाच्या जीडीपीमध्ये जवळपास 31.5 टक्के योगदान देते. तसेच यामध्ये सामील असलेले सर्व देश हे जी - 20 परिषदेचे देखील सदस्य आहेत. तसेच या देशाची लोकसंख्या ही जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे 41 टक्के इतकी आहे. या ब्रिक्स मुख्यालय हे चीनमध्ये आहे. ब्रिक्सची परिषद दरवर्षी होते. पण त्याचे यजमानपद वेगवेगळ्या देशांना दिले जाते. यंदा हे यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडे आहे. तर ब्रिक्सची पहीली परिषद ही 2006 साली पार पडली होती. त्याचवेळी याचे नाव ब्रिक्स असे करण्यात आले होते. 


कोणते देश 'ब्रिक्स'मध्ये सामील होण्यासाठी इच्छुक


ब्रिक्समध्ये सहभागी होण्यासाठी अनेक देश इच्छुक असल्याचं म्हटलं जातं. सध्या ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी अल्जीरिया, अर्जेंटीना, इजिप्त, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब या देशांनी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर तुर्की, मॅक्सिको, पाकिस्तान, सुदान, थायलंड या देशांनी देखील ब्रिक्समध्ये देखील सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ब्रिक्समध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची औपचारिक प्रक्रिया करावी लागत नाही. ब्रिक्समध्ये जे देश समाविष्ट आहेत ते नवीन देशाला यामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी चर्चा करतात. त्यानंतर नवीन देशाला ब्रिक्समध्ये सामील करुन घेण्यात येते.


हेही वाचा : 


BRICS Summit: दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी रवाना, ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये होणार सहभागी