Chandrayaan-3 Update: भारताच्या महत्त्वकांक्षी चांद्रयान -3 (Chandrayaan-3) ने चंद्राच्या पाचव्या आणि शेवटच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. त्यामुळे आता विक्रम लँडर (Vikram Lander) वेगळं होण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. याआधी इस्रोकडून (ISRO) 17 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्रापासून वेगळं होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता चंद्रावर पोहचण्यासाठी अगदी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.
लँडरची गती आता मंदावणार
चांद्रयानाच्या पुढील प्रक्रियेमध्ये विक्रम लँडरला चंद्राच्या सर्वात जवळील कक्षेत प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. यासाठी विक्रम लँडरचा वेग मंदावणार आहे. या प्रक्रियेनंतर 3 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार आहे. तसेच विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरणार असल्याचा विश्वास इस्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
चांद्रयानाचा असा होता प्रवास
याआधी इस्रोने ट्वीट करत म्हटलं होतं की, चांद्रयान-3 ने चंद्राच्या 153 किमी x 163 किमीच्या कक्षेत प्रवेश केला आहे. तसेच यामुळे चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. 4 जुलै रोजी यशस्वी प्रेक्षणपण केल्यानंतर चांद्रयान-3 ने 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर, 6, 9 आणि 14 ऑगस्ट रोजी चांद्रयानाने चंद्राच्या पुढील कक्षांमध्ये प्रवेश केला आणि चंद्राच्या जवळ हे यान पोहचले.
खरी परीक्षा अजूनही बाकीच
चांद्रयान - 3 बद्दल माहिती देताना इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले की, लँडरचा वेग 30 किमी वरुन लँडिंगच्या शेवटच्या टप्प्यावर आणणे ही लँडिंगचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तसेच या यानाला आता हॉरिझॉन्टल स्थितीमधून वर्टिकल स्थितीमध्ये आणावे लागते. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये आमची कसब लागणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेची अनेकदा पुनरावृत्ती होते.या सर्व टप्प्यांमध्ये, आवश्यक प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी आणि योग्य लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यासाठी विविध अल्गोरिदम लावले जातात. जर विक्रम लँडरने चंद्राच्या ष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले तर भारतासाठी हा सुवर्णक्षण ठरणार आहे. त्यामुळे या चांद्रयानाचा पुढचा प्रवास कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याआधी चांद्रयान -3 ने चंद्राचा पहिला फोटो देखील पाठवला होता. तसेच आता काहीही झालं तरी विक्रम लँडर यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग करणार असल्याचा विश्वास इस्रोच्या शास्रज्ञांनी व्यक्त केला आहे. तर विक्रम लँडरची रचनाच ही त्या पद्धतीने करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.