Chandrayaan 3: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’चं चांद्रयान 3 (Chandrayaan 3) यशस्वीरित्या चंद्रावर लँड झाल्यानंतर त्याने चंद्रावरुन आपलं काम सुरू केलं आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलं. यानंतर ‘विक्रम’ लँडरमधून ‘प्रज्ञान’ रोव्हर बाहेर पडलं आणि त्याने चंद्रावर संशोधनाला सुरूवात केली आहे. नुकतंच रोव्हरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ऑक्सिजनचे पुरावे मिळाले आहेत. तर आता हायड्रोजनचा शोधही सुरू आहे. हे सर्व सुरू असताना विक्रम लँडर चंद्रावर नेमकं कसं दिसतं? याचा फोटो प्रज्ञान रोव्हरने काढला आहे.


प्रज्ञान रोव्हरने काढले विक्रम लँडरचे फोटो


भारताने आपला चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून इतिहास रचला. चांद्रयान 3 चंद्रावर उतरल्यापासून विक्रम लँडरच्या माध्यमातून चंद्रावरील गोष्टींची वेगवेगळी माहिती आपल्यासमोर येत आहे. याच संशोधक विक्रम लँडरचा चंद्रावरील फोटो प्रज्ञान रोव्हरने काढला आहे. याबाबत इस्रोने ट्विट देखील केलं आहे. इस्रोने ट्वीटच्या कॅप्शनमध्ये म्हटलं की, "स्माईल प्लीज! प्रज्ञान रोव्हरने विक्रम लँडरचा सकाळी फोटो काढला. प्रज्ञान रोव्हरच्या नेव्हिगेशन कॅमेऱ्याने हा फोटो काढला आहे."






चांद्रयान इस्रोला चंद्रावरील फोटो नेहमी पाठवत असतं. कधी चंद्रावरील खड्ड्यांचे, कधी यानाच्या चाकांच्या निशाणाचे, तर कधी चंद्रावरील अन्य पृष्ठभागाचे किंवा मातीचे. दरम्यान, आता प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर उतरलेल्या विक्रम लँडरचा फोटो इस्रोला पाठवला आहे. हे फोटो इस्रोने ट्विटरवर शेअर केले आहेत, या फोटोंना इस्रोने दिलेलं कॅप्शनही मजेशीर आहे.


चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय आढळलं?


इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, इस्रोच्या माहितीनुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ॲल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टिटॅनियम, मॅगनिस, सिलिकॉन आणि ऑक्सिजन असल्याची माहिती देण्यात आली आहे.  दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात धातू असल्याचे आढळून आलं आहे. दक्षिण ध्रुवावर हायड्रोजनचा शोध रोव्हरकडून सुरू असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. 


'प्रज्ञान'ने दक्षिण ध्रुवावरील मातीचे तापमान मोजले 


विक्रम लँडरमधून वेगळे झाल्यानंतर प्रज्ञान रोव्हरने आपल्या कामास सुरुवात केली आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण सुरू केलं. इस्रोने मातीच्या तापमानाचा आलेखही शेअर केला आहे. आलेखामध्ये तापमान उणे 10 अंश सेल्सिअस ते 50 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याचं दिसून आलं. 


हेही वाचा:


Aditya L-1 Mission: तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येणार इस्रोच्या 'आदित्य L-1' मोहिमेचं प्रक्षेपण! 2 सप्टेंबरला लाँचिंग; 'असं' करा रजिस्ट्रेशन