Chandrayaan-3 Mission : भारताचे चांद्रयान 3 (Chandrayaan 3) हे चंद्रापासून केवळ 25 किमी दूर असून 23 ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरणार आहे. भारताच्या या मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं असून त्या संबंधी आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चांद्रयान 3 चे प्रोपल्शन मॉड्यूल (Propulsion Module) हे तीन ते सहा महिने काम करू शकतं असं सागण्यात येत होतं. पण हे प्रोपल्शन मॉड्यूल अनेक वर्षे काम करू शकतं असा दावा इस्त्रोने केला आहे. 


विक्रम लँडरपासून प्रोपल्शन मॉड्यूल (Propulsion Module) 17 ऑगस्ट 2023 रोजी वेगळे झाले. त्यापूर्वी प्रोपल्शन मॉड्यूलचे आयुष्य हे तीन ते सहा महिने असल्याचं सांगितलं जात होतं. पण आता ते अनेक वर्षे काम करू शकते अशी माहिती समोर आली आहे. 


इस्रोची चांद्रयान-३ चंद्र मोहीम आता अतिशय रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. त्याच्या विक्रम लँडरला (Vikram Lander) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरायचे आहे. तीन दिवसांपूर्वी तो त्याच्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळा झाला. 17 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चे दोन भाग वेगळे झाले.


इस्रोचे माजी शास्त्रज्ञ विनोद कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, जेव्हा चांद्रयान-3 लाँच करण्यात आले त्यावेळी प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये 1696.4 किलो इंधन होते. यानंतर प्रोपल्शन मॉड्यूलच्या मदतीने पाच वेळा पृथ्वीभोवती कक्षा बदलण्यात आली. इंजिन सहा वेळा सुरू झाले. यानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या ट्रांस-लूनार ट्रॅजेक्टरी पोहोचले. या दरम्यान एकूण 1546 किलो इंधनाचा वापर झाला. त्यामुळे 150 किलो इंधन उरले आहे. पण यामुळे प्रोपल्शन मॉड्यूल अनेक वर्षे काम करु शकते. 


चांद्रयान-2 चे ऑर्बिटर अजूनही काम करत आहे. तुलनेत चांद्रयान-3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये भरपूर इंधन शिल्लक आहे. पण सर्वकाही सुरळीत चालले तर चांद्रयान 3 चे प्रोपल्शन मॉड्यूल हे अनेक वर्षे काम करू शकेल असा दावा विनोद कुमार श्रीवास्तव यांनी केला आहे. 


काही तासातच चांद्रयानचे लँडिग होणार 


'चांद्रयान-3' साठी पुढील 24 तास महत्वाचे आहेत. चांद्रयान-3 चं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान-3 संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे. लँडिंग करण्यापूर्वी, मॉड्यूलची तपासणी होईल.


 






चांद्रयान-3 चंद्रावर उतरल्यावर पुढे काय?


चांद्रयान-3 मोहिमेचं पहिलं लक्ष्य चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे उतरणं आहे. चांद्रयानमधील लँडरचं नाव 'विक्रम' आणि रोव्हरचं नाव 'प्रज्ञान' आहे. विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल. चांद्रयान-3 चं रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर तेथील माहिती गोळा करुन चंद्राची रहस्यं उलगडण्यास मदत होईल. चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल. त्यामुळे या मोहिमेकडे भारताप्रमाणे जगाचं लक्ष लागलं आहे. 


ही बातमी वाचा: