याविषयी माहिती देताना इसरोचे चेअरमन के. सिवन म्हणाले की, 'लँडर विक्रम' को चंद्राच्या 2.1 किलोमीटरजवळ पोहोचेपर्यंत सर्व प्रक्रिया सामान्य होती. मात्र नंतर लँडरचा संपर्क तुटला. आता डेटा विश्लेषणाचे काम सुरु आहे.
दरम्यान अद्याप भारताची ही मोहीम अयशस्वी ठरलेली नाही. लॅण्डरशी जरी संपर्क तुटला असला तरी ऑर्बिटरद्वारे मोहीमेचा बराचसा भाग पूर्ण करता येणार आहे. सध्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार लॅण्डरकडून सिग्नल येणं बंद झालं आहे. परंतु लॅण्डरशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुर आहे. तसेच ऑर्बिटद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांसह देशभरातील नागरिक निराश झाले आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र इस्रोच्या शास्त्रज्ञांची पाठ थोपटत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
शास्त्रज्ञांची पाठ थोपटताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आयुष्यात अनेकदा यश-अपयश मिळत असतं. तुम्ही (इस्रोने) या मोहीमेद्वारे जे साध्य केलं आहे ते यश छोटं नाही. मला आणि देशाला तुमचा अभिमान आहे.
मोदींनी शास्त्रज्ञांची पाठ थोपटली, तसेच त्यांना पुढील कामांसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोदी म्हणाले की, तुम्ही या मोहीमेद्वारे देशासाठी, विज्ञानासाठी आणि मानवजातीसाठी खूप मोठं काम केलं आहे. मी तुमच्यासोबत आहे, हिंमत राखा, तुमच्या प्रयत्नांनी देश खूप आनंदी होईल.
चांद्रयान-2 मोहिमेतील महत्वाच्या बाबी
- पृथ्वीपासून 181.6 किमी अंतरावर गेल्यावर चांद्रयान-2 प्रक्षेपकापासून वेगळं झालं.
- यानंतर 23 दिवस चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेत
- 30 ते 42 दिवसात चांद्रयान चंद्राच्या कक्षेत प्रवेश
पहिलं प्रक्षेपण स्थगित
गेल्या सोमवारी म्हणजे 15 जुलैला चांद्रयान 2 लॉन्चिंग स्थगित झालं होतं. तांत्रिक कारणांमुळे लाँचिंग काऊंटडाऊनच्या जवळपास 56 मिनिट आधीच मोहीम स्थगित करण्यात आली होती. भारतच नव्हे तर अवघ्या जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलं होतं. वेहिकल सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून चांद्रयान-2 चं लॉन्चिंग थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं इस्रोने घेतला होता. त्यानंतर 22 जुलै रोजी दुपारी 2.43 मिनिटांनी चांद्रयान 2 चं लॉन्चिंग झालं होतं.
पाहा काय म्हणाले नरेंद्र मोदी