बंगळुरु : भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. चांद्रयान यशस्वीपणे चंद्राजवळ पोहोचले खरे परंतु चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या दोन किलोमीटरवर असताना चांद्रयानाच्या विक्रम लॅण्डरशी इस्रोचा संपर्क तुटल्याने इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावरील चिंता वाढल्या आहेत.


भारताची ही मोहीम अयशस्वी ठरलेली नाही. लॅण्डरशी जरी संपर्क तुटला असला तरी ऑर्बिटरद्वारे मोहीमेचा बराचसा भाग पूर्ण करता येणार आहे. सध्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार लॅण्डरकडून सिग्नल येणं बंद झालं आहे. परंतु लॅण्डरशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुर आहे. तसेच ऑर्बिटद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांसह देशभरातील नागरिक निराश झाले आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र इस्रोच्या शास्त्रज्ञांची पाठ थोपाटत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

शास्त्रज्ञांची पाठ थोपाटताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आयुष्यात अनेकदा यश-अपयश मिळत असतं. तुम्ही (इस्रोने) या मोहीमेद्वारे जे साध्य केलं आहे ते यश छोटं नाही. मला आणि देशाला तुमचा अभिमान आहे.

मोदींनी शास्त्रज्ञांची पाठ थोपाटली, तसेच त्यांना पुढील कामांसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोदी म्हणाले की, तुम्ही या मोहीमेद्वारे देशासाठी, विज्ञानासाठी आणि मानवजातीसाठी खूप मोठं काम केलं आहे. मी तुमच्यासोबत आहे, हिंमत राखा, तुमच्या प्रयत्नांनी देश खूप आनंदी होईल.

पाहा काय म्हणाले नरेंद्र मोदी