तिरुपती : तिरुपतीच्या प्रसादाबद्दल महत्त्वाची बातमी आहे. प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी जे तुप वापरण्यात येतं, त्या तुपात चरबीचे अंश सापडले असा दावा आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. प्रसादाच्या चाचणीचा अहवाल आता समोर आला आहे. त्यामध्ये चरबीचा आणि फिश ऑईलचे अंश आढळल्याचं नमूद करण्यात आल्याचा दावा सत्ताधारी तेलुगु देसम पार्टीनं केला आहे. 


गुजरातमधील प्रयोगशाळेत तिरुपती बालाजी येथील देवस्थानाकडून प्रसाद म्हणून दिला जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचे अंश आढळल्याचा अहवाल मिळाल्याचा दावा टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी केला. त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचा दावा केला.   


प्रयोगशाळेच्या कथित अहवालात लाडूच्या नमुन्यांमध्ये प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी जे तुप वापरण्यात येतं, त्या तुपात चरबीचे अंश सापडले असल्याचा दावा करण्यात आला. हे नमुने 9 जुलै 2024  आणि 16 जुलै रोजी घेण्यात आले होते. आंध्र प्रदेश सरकार आणि तिरुमाला तिरुपती देवस्थान जे श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचं व्यवस्थापन करते त्यांनी या अहवालाला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. 


तिरुपतीच्या प्रसादातील तुपात चरबीचे अंश आढळल्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र, गायीला व्याधी असतील तर नैसर्गिकरित्या दुधामध्ये चरबीचे अंश येऊ शकतात, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.



तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंवरुन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विरोध पक्ष वायएसआर काँग्रेसवर आरोप केले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती देवस्थानाच्या प्रसादाबद्दल गंभीर आरोप केला होता. नायडू यांचे कट्टर विरोधक आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर व्हायचा, असा अतिशय धक्कादायक आरोप नायडू यांनी केला होता. यामुळे आंध्रमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे, कारण तिरुमला तिरुपती देवस्थानाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात.


वायएसआर काँग्रेसकडून विरोध


वायएसआर काँग्रेसनं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केलेला दावा फेटाळला आहे. वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांची बहीण आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा वायएस शर्मिला यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे. तिरुपती येथील लाडू प्रकरणी राजकारण केलं जात असल्यावरुन मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसवर शर्मिला यांनी टीका केली. 


वायएसआर काँग्रेसचे नेते राज्यसभा खासदार वाय.वी. सुब्बा रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या आरोपानं भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं म्हटलं. सुब्बा रेड्डी यांनी देवासाठी अर्पण केल्या जाणाऱ्या प्रसादात आणि भक्तांना दिल्या जाणाऱ्या लाडूत प्राण्यांच्या चरबीचा वापर केला गेल्याचा दावा कल्पना करण्यापलीकडं आहे.  मी व्यकंटेश्वर स्वामी यांच्यात आस्था ठेवतो, त्याचवेळी चंद्राबाबू नायडू देखील भक्त असल्याचा दावा करतात. त्यामुळं देवासमोर या आणि शपथ घ्या, मी माझ्या कुटुंबासह येऊन शपथ घ्यायला तयार असल्याचं सुब्बा रेड्डी म्हणाले.


इतर बातम्या :


तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंसाठी जनावरांच्या चरबीचा वापर? मुख्यमंत्री चंद्राबाबूंचा माजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप